दिवसा रुग्णसेवा अन् रात्री UPSC ची तयारी; पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर अक्षिता बनली IAS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 13:25 IST2026-02-08T13:17:59+5:302026-02-08T13:25:00+5:30

दिवसा रुग्णांची सेवा अन् रात्री स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी केलेली धावपळ, ज्यात शिस्त, त्याग, धैर्य आणि स्वत:वरील विश्वासाची गरज होती. डॉ. अक्षिता गुप्ताची कहाणी अशीच हिंमत आणि स्वप्नांसाठी जगणे शिकवते.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरी करता करता ती यूपीएससीची तयारी करण्यासाठी वेळ काढत होती. ब्रेकमध्येही ती खिशात नोट्स ठेवून अभ्यास करत असायची. तिची ही मेहनत आणि चिकाटी एक दिवस तिला तिचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पुढे नेत होती.

यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात अक्षिता ६९ वा रँक मिळवून परीक्षेत यशस्वी झाली. अक्षिताच्या या यशाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया.. डॉ. अक्षिता गुप्ता, हरियाणाच्या पंचकूला येथे राहणारी एक युवती आहे. तिने UPSC ची तयारी तेव्हापासून सुरू केली होती जेव्हा ती चंदीगड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये MBBS करत होती.

त्याचवेळी तिला क्लिनिकल प्रॅक्टिससोबत मुद्द्यांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची जाणीव झाली. तिने मेडिकलचं शिक्षण घेण्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारीही सुरू केली. मेडिकल इंटर्नशिपमध्ये हॉस्पिटलमधील धावपळ, रुग्णांची जबाबदारी आणि शिफ्टनुसार ड्युटी हे सगळे सांभाळून ती तिच्या स्वप्नांसाठी मेहनत घेत राहिली.

हॉस्पिटलमध्ये छोट्या छोट्या ब्रेकमध्येही ती अभ्यासावर लक्ष देत होती. वेळ वाचवण्यासाठी तिने आवश्यक नोट्स तिच्या खिशातच ठेवत होती. पुस्तकांची पानेही ती स्वत:कडे ठेवायची आणि वेळ मिळाल्यावर लगेच अभ्यास करायची.

अनेकदा अक्षिताची शिफ्ट १२ ते १४ तासांची असायची. इतका वेळ काम करूनही थकवा न घेता तिने शिक्षण सुरूच ठेवले. नोकरी न सोडता, शारीरिक थकवा आणि अनेक आव्हानांना सामोरे जाणे कठीण होते परंतु अशक्य नव्हते.

२०२० मध्ये अक्षिता हिने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवत ६९ वी रँक मिळवली. आज ती पंजाब कॅडेरमधील आयएएस अधिकारी म्हणून देशसेवा करत आहे. अक्षिताने कधीही तिच्या वैद्यकीय पार्श्वभूमीला तिच्या तयारीतील अडथळा मानले नाही, उलट ती तिची सर्वात मोठी ताकद मानली आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

अक्षिताने वैद्यकीय विज्ञान हा तिचा पर्यायी विषय म्हणून निवडला आणि तिच्या अनुभवाचा योग्य दिशेने वापर करण्याचा निर्णय घेतला. रुग्णांची सेवा करताना तिला समाजाची सखोल समज मिळाली.

















