पेन्सिल पकडण्यासाठी करत होता संघर्ष, आज बनला अधिकारी; गंभीर आजारावर मात करत मानवेंद्रची UPSC मध्ये भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 18:18 IST2025-12-28T18:06:15+5:302025-12-28T18:18:22+5:30
"यश हे केवळ शरीराच्या हालचालींवर अवलंबून नसते, तर ते अढळ ध्येयावर अवलंबून असते," हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या २४ वर्षीय मानवेंद्र सिंह याने सिद्ध करून दाखवले आहे. सेरेब्रल पाल्सी सारख्या गंभीर आजाराशी जन्मापासून झुंज देणाऱ्या मानवेंद्रने पहिल्याच प्रयत्नात UPSC ची अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली असून, देशात ११२ वी रँक पटकावली आहे.

मानवेंद्र अवघ्या सहा महिन्यांचा असताना त्याला सेरेब्रल पाल्सी असल्याचे निदान झाले. हा एक असा मज्जासंस्थेचा विकार आहे जो स्नायूंच्या हालचाली, शरीराचा समतोल आणि समन्वयावर परिणाम करतो. लहानपणी त्याला आपली मानही सरळ धरता येत नव्हती आणि उजव्या बाजूचे शरीर कडक होत गेले. सामान्य मुलांसाठी सहज असणारी कामे मानवेंद्रसाठी दररोजची एक कठीण परीक्षा होती.

त्याची आई रेनू सिंह, ज्या एका खासगी शाळेत मुख्याध्यापिका आहेत, सांगतात की, "त्याला साधी पेन्सिल पकडणेही जमत नव्हते. तो बोटांनी पेन्सिल पकडू शकत नसल्याने मुठीत घट्ट धरून लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अनेक वर्षे त्याने याच जिद्दीने सराव केला." उपचारासाठी कुटुंबाने देशभरातील ५० हून अधिक डॉक्टरांचे उंबरठे झिजवले, तेव्हा कुठे त्याची प्रकृती स्थिर झाली.

मानवेंद्र १७ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. या धक्क्याने कुटुंब पूर्णपणे खचले होते, पण अशा परिस्थितीतही मानवेंद्रने स्वतःला सावरले. कुटुंबाची जबाबदारी ओळखून त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने केवळ कुटुंबाला आधार दिला नाही, तर स्वतःच्या स्वप्नांचा पाठलागही सुरू ठेवला.

मानवेंद्र अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार होता. १२ वी नंतर त्याने आयआयटीमध्ये जाण्याचे ठरवले. त्याने JEE Advanced परीक्षेत 'ऑल इंडिया रँक ६३' मिळवून सर्वांना थक्क केले. २०२४ मध्ये त्याने आयआयटी पाटणा येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले. त्यानंतर लगेचच त्याने सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

तीन टप्प्यांच्या या खडतर प्रवासात मानवेंद्रने कधीही हार मानली नाही. १७ डिसेंबर २०२५ रोजी लागलेल्या निकालात त्याने ११२ वी रँक मिळवून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. आता तो रेल्वे, दूरसंचार किंवा वीज यांसारख्या महत्त्वाच्या केंद्रीय विभागांमध्ये तांत्रिक पदावर देशसेवा करणार आहे.

मानवेंद्रच्या या यशाबद्दल बोलताना त्याची आई भावूक झाली. त्या म्हणतात, "हे यश केवळ एका पदासाठी नाही, तर माझ्या मुलाने लहानपणापासून दिलेल्या लढ्याचा हा सन्मान आहे. त्याने कधीही 'मला हे जमणार नाही' असा विचार केला नाही."

मानवेंद्र सिंह यांची ही कथा आज देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याने हे दाखवून दिले की, शारीरिक मर्यादा तुम्हाला रोखू शकत नाहीत, जर तुमचे पंख तुमच्या जिद्दीचे असतील.

















