वयाच्या १४ व्या वर्षी उभारली कंपनी; आज बनला कोट्यधीश; एका सायकलनं आयुष्य बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 11:22 AM2023-04-07T11:22:39+5:302023-04-07T11:30:07+5:30

एखाद्याने जर जिद्दच धरली तर यशाचे मार्ग सापडत जातात. खऱ्या आयुष्याचे हेच सूत्र आहे. ज्या वयात शाळेत मुले पाढे गिरवतात त्यात एका मुलाने स्वत:च्या कंपनीचा पाया उभारला. शाळेपासून घर लांब होते. सायकलीने शाळेत जाताना घाम फुटायचं यावर त्याने तोडगा काढायचं ठरवले.

मनात विचार आणला आणि त्याने त्याच्या सायकलचे इलेक्ट्रीक सायकलमध्ये रुपांतर करण्याचा फॉर्म्युला शोधला. इथूनच त्याच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. तो ऑटोमोबाईल क्षेत्रात पाय रोवणारा कमी वयातील युवा उद्योजक म्हणून पुढे आला. वयाच्या १४ व्या वर्षी त्याने स्वत:ची ऑटोमोबाईल कंपनी सुरू केली.

१७ व्या वयात या मुलानं इंम्पोर्ट-एक्सपोर्ट लायसेन्स मिळवले. भारतात इतक्या कमी वयात कुणालाही आजतागायत परवाना मिळाला नव्हता. आज वयाच्या २२ व्या वर्षी या युवकाने जगभरात शोरूम आहेत. या युवकाचं नाव आहे राज मेहता(Raj Mehta Success Story)

राज मेहता गुजरातच्या महिसागरमध्ये राहणारा आहे. लहानपासून राजची जिज्ञासू वृत्ती आहे. तो खेळण्यालाही तोडूनमोडून पुन्हा जसं आहे तसं करायचा. रिमोर्ट कार कशी चालते त्यासाठी आत काय आहे हे पाहण्याची त्याची उत्सुकता असायची.

शिक्षणात अव्वल असूनही तो शाळेत कमी हजर राहायचा. महिसागर लहान ठिकाण आहे. त्यामुळे तेथील सुविधा मर्यादित आहेत. २०१३ मध्ये तो अहमदाबादला नातेवाईकांकडे राहू लागला. घरापासून शाळा १०-१५ किमी अंतरावर होती.

रोज सायकलवरून शाळेत येणे-जाणे असे. इतका दूरचा प्रवास सायकलने करून राज थकून जायचा. त्यामुळे त्याने या समस्येवर तोडगा काढण्याचं ठरवले. एकेदिवशी तो फिजिक्स टीचरकडे गेला आणि त्याची सायकल इलेक्ट्रीक सायकल कशी करायची हे विचारू लागला.

टीचरने पद्धत शिकवली परंतु ते पुरेसे नव्हते. त्यानंतर स्वत: जिद्दीने पुढाकार घेऊन अनेक गोष्टी रिसर्च केल्या. तांत्रिकबाबी समजून प्रयोग करणे सुरू केले. अनुभव घेण्यासाठी तो भंगारवाल्याकडून कारचे पार्ट्सचे घेऊ लागला. त्याचे बचतीचे ४०-४५ हजार यात गुंतवले.

प्रयोग करता करता इलेक्ट्रीक कंपोनेटसाठी कोरियातून माल मागवावा लागेल हे कळाले. त्यानंतर वडिलांकडून काही पैसे मागितले. परंतु त्यांनी नकार दिला. पैशासाठी रोज छोटी-मोठी कामे करू लागला. परंतु तरीही हवे तेवढे पैसे जमा झाले नाहीत.

अखेर आजोबाकडे जात यासाठी पैसे मागितले. त्यांचे ज्वेलरी शॉप होते. आजोबांनी पैसे दिले परंतु प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागेल ही अट ठेवली. राज तयार झाला. या पैशातून आवश्यक सामान कोरियातून मागवले. प्रयोग सुरू झाला. २० तास काम करून तो मशीन बनवण्याचा प्रयत्न करत होता.

अखेर राजचा प्रयोग यशस्वी झाला. सर्वात आधी वडिलांकडूनच त्याने इलेक्ट्रीक सायकलची चाचणी घेतली. सायकल घेऊन गेलेले वडील अर्ध्या तासाने आनंदाने घरी आले. इलेक्ट्रीक सायकलचा फॉर्म्युला राजला मिळाला होता. २.५ किलोची मशीन ७० किलोच्या व्यक्तीने यशस्वीरित्या चालवून पुन्हा आणली यात समाधान होते.

त्यानंतर राजनं वयाच्या १४ व्या वर्षी राज इलेक्ट्रोमोटिव्ज नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी इलेक्ट्रीक सायकल, रिक्षा वाहनाचे किट उपलब्ध करून देऊ लागली. किटची किंमत माफक ठेवली. परदेशी ग्राहकही जोडले गेले. इम्पोर्ट-एक्सपोर्टसाठी २० वेळा प्रयत्न केल्यानंतर परवाना हाती लागला.

जून २०१९ मध्ये राज मेहताने आणखी एका ब्रँडची निर्मिती केली. ती म्हणजे ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटर्स..ही कंपनी माफक दरात इलेक्ट्रिक स्कूटर विक्री करते. ग्रेटा कंपनीचे देशभरात शोरूम आहेत. नेपाळमध्येही या कंपनीचे २ शोरूम आहेत.