Hockey! A game that has enhanced the pride of the country for years ...
हॉकी! वर्षांनुवर्षे देशाची शान वाढवणारा खेळ... By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 11:04 AM2021-08-15T11:04:27+5:302021-08-15T11:28:15+5:30Join usJoin usNext Hockey : देशाच्या गळातील ताईत असलेला हॉकी हा खेळ वर्षांनुवर्षे देशाची शान वाढवत आहे... हॉकी हा खेळ देशाचा अभिमान. या खेळात आपण एकेकाळी दादा होतो. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पुन्हा तीच चुणूक दाखविली. पुरुष संघाने कांस्य पदकाची कमाई करताना, तब्बल ४१ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. दुसरीकडे, महिला संघाने सुरुवातीचे सलग तीन सामने गमावल्यानंतरही पटकावलेले चौथे स्थान कौतुकास्पद ठरले. यामुळे पुन्हा एकदा भारत आपल्या राष्ट्रीय खेळामध्ये सुवर्ण दिन आणण्यात यशस्वी ठरणार असल्याचा विश्वास मिळाला. देशाच्या गळातील ताईत असलेला हॉकी हा खेळ वर्षांनुवर्षे देशाची शान वाढवत आहे...अॅमस्टरडॅम १९२८ । सुवर्ण नेदलँड्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारताने एकतर्फी वर्चस्व राखताना ३-० अशी बाजी मारली. हॉकीचे जादूगार ध्यानचंद भारताच्या सुवर्णाचे शिल्पकार ठरले. संपूर्ण स्पर्धेत भारताने केलेल्या २९ गोलपैकी ध्यानचंद यांनी एकट्याने १४ गोल केले होते.लॉस एंजेलिस, १९३२ । सुवर्ण या ऑलिम्पिकमध्ये केवळ तीन संघांचा समावेश होता. भारताने जपानला ११-१ असे लोळवल्यानंतर अमेरिकेचा ९-२ असा पाडाव केला. यानंतर तिसरी लढत पुन्हा अमेरिकेविरुद्ध झाली आणि यात भारताने २४-१ असा दणदणीत विजय मिळवला. भारताकडून यावेळी चमकले ते ध्यानचंद यांचे लहान बंधू रुप सिंग. त्यांनी स्पर्धेत एकूण १३ गोल केले.बर्लिन, १९३६ । सुवर्ण पुन्हा एकदा आपली जादू दाखवताना ध्यानचंद यांनी भारताला सलग तिसरे सुवर्ण पदक जिंकवून दिले. अंतिम सामना १५ ऑगस्टला जर्मनीविरुद्ध रंगला. यावेळी जर्मनीचा हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलरही उपस्थित होता. भारताने जर्मनीचा ८-१ असा धुव्वा उडवत सुवर्ण हॅटट्रिक नोंदवली. संपूर्ण स्पर्धेत भारताने पाच सामन्यांतून तब्बल ३८ गोल केले, तर केवळ एक गोल स्वीकारला.लंडन, १९४८ । सुवर्ण स्वतंत्र भारताची पहिली ऑलिम्पिक स्पर्धा. मात्र हॉकीमधील निकालात कोणताही बदल झाला नाही. भारताने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनचा ४-० असा पराभव करत धमाकेदार विजयासह सलग चौथे सुवर्ण पटकावले. अंतिम फेरीत ब्रिटनला नमवल्याने हे सुवर्ण विशेष ठरले. बलबीर सिंग ज्यूनिअर यांनी तिसऱ्या व ५५ व्या मिनीटाल गोल केला. भारताने स्पर्धेत एकूण १९ गोल केले.हेलसिंकी, १९५२ । सुवर्ण अंतिम फेरीत नेदरलँड्सला ६-१ असे नमवत भारताने सुवर्ण पंच नोंदवला. अंतिम सामन्यातील भारताच्या सहा गोलपैकी पाच गोल एकट्या बलबीर सिंग सिनिअर यांनी केले. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी एकूण ९ गोल केले.मेलबर्न, १९५६ । सुवर्ण कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध झालेला हा अंतिम सामना कमालीचा रोमांचक ठरला. केवळ एक गोल झालेल्या या सामन्यात रनधिर सिंग जेंटल यांनी निर्णायक गोल केला होता. या सामन्यात बलबीर सिंग सिनिअर हाताला दुखापत झालेली असतानाही खेळले होते.रोम, १९६० । रौप्य पदक ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारताला सुवर्ण मिळवता आले नाही. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात पाकने १-० अशी बाजी मारत १९५६ ऑलिम्पिकच्या पराभवाचा वचपा काढला. नासीक अहमद बुंदा यांनी सहाव्याच मिनिटाला केलेला गोल सामन्यातील एकमेव व निर्णायक ठरला.टोकियो, १९६४ । सुवर्ण पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान अशा अंतिम सामन्यात भारताने १-० अशी बाजी मारत सातवे सुवर्ण जिंकले. मोहिंदर लाल यांनी ४०व्या मिनिटाला विजयी गोल केला होता.मेक्सिको, १९६८ । कांस्य ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथमच अंतिम फेरी गाठता आली नाही. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-२ असा पराभव झाल्यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत भारताने पश्चिम जर्मनीचे आव्हान २-१ असे परतावले आणि पहिल्यांदाच कांस्यवर समाधान मानले.म्युनिक, १९७२ । कांस्य भारताला सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने उपांत्य फेरीत ०-२ असे नमवल्यानंतर भारताने नेदरलँड्सला २-१ असा धक्का देत कांस्य पदक मिळवले. ऑलिम्पिक इतिहासातील भारताचे हे दहावे पदक ठरले.मॉस्को, १९८० । सुवर्ण राजकीय वादामुळे अनेक देशांनी बहिष्कार टाकलेल्या या ऑलिम्पिकमध्ये केवळ सहा देशांनी हॉकीत सहभाग घेतला होता. यावेळी राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत भारताने तीन विजय व दोन बरोबरी अशी कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात स्पेनला ४-३ असे नमवत भारताने विश्वविक्रमी आठवे सुवर्ण जिंकले. सुरिंदर सिंग सोढीने दोन, तर कौशिक व मोहम्मद शाहिद यांनी प्रत्येकी एक गोल केला होता.टोकियो, २०२१ । कांस्य यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाची अपेक्षा निश्चित होती. टोकियो ऑलिम्पिकआधीच्या अनेक स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार खेळ केला होता. त्यामुळेच यंदा इतिहास घडण्याची खात्री होती आणि झालेही तसेच. दीर्घ कालावधीनंतर उपांत्य फेरीत धडक दिल्यानंतर भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रिकाम्या हाती न परतण्याचा ध्यास घेतलेल्या भारतीयांनी यानंतरच्या निर्णायक सामन्यात जर्मनीला ५-४ असा धक्का दिला आणि ४१ वर्षांनी कांस्य पदकाच्या रुपाने ४१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकले. यासह भारताने ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक १२ हॉकी पदके जिंकण्याचा विश्वविक्रमही केला.लोकप्रियतेचा घ्यावा फायदा क्रिकेटने अल्पावधीत भारतात जम बसविला आणि पुढचीच १९८७ सालची विश्वचषक स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली आयोजित झाली. हॉकीमध्येही अशी क्रांती घडू शकते आणि तसे संकेतही मिळत आहेत.पण हॉकी इंडियाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. भारतीय हॉकीने आतापर्यंतच्या वाटचालीत एक चांगले काम केले ते म्हणजे ग्रॅहम रीड यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविली. आता भारतीय संघाने कामगिरीत सातत्य राखले, तर नक्कीच आगामी २०२४ सालच्या ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक आपलेच असेल. पण सध्या देशात हॉकीचे वारे वाहू लागले असून याचा फायदा घेत आपल्याला भक्कम वाटचाल करायची आहे.टॅग्स :हॉकीHockey