हार्ट अटॅक टाळायचा तर किती वाजता जेवाल? खाण्यास जितका उशीर तितका वाढतोय धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 09:54 IST2023-12-20T09:49:18+5:302023-12-20T09:54:02+5:30
खाण्याच्या पद्धती आणि हृदयरोग यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. आजकाल कमी वयातच तरुणांना हार्ट एटॅक येतो.

लंडन : सकाळी वेळेत नाष्टा, दुपारी वेळेत जेवण आणि रात्री ८ वाजण्याआधी डिनर केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका कमी होत असल्याचा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे की, संशोधकांनी १,०३,३८९ सहभागींच्या डेटाचा अभ्यास करून खाण्याच्या पद्धती आणि हृदयरोग यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. सहभागींमध्ये ७९ टक्के महिला होत्या. त्यांचे सरासरी वय ४२ वर्षे होते. उत्तम जीवनशैलीने आरोग्य उत्तम राहत असल्याचे संशोधकांनी सांगितले.
निष्कर्ष काय?
स्पेनच्या बार्सिलोना इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थच्या संशोधकांनी आहारातील पोषण गुणवत्ता, जीवनशैली आणि झोपेच्या चक्राचा अभ्यास करून निष्कर्ष काढला की, नाश्ता न करणे आणि दुपारचे जेवण उशिरा करण्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. खाण्यास प्रत्येक तास उशीर झाल्यास हाच धोका ६ टक्क्यांनी वाढतो.
आठ वाजता सकाळी नाष्टा करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत ९ वाजता नाष्टा करणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका सहा टक्के जास्त असतो.
महिलांना अधिक धोका
संशोधकांच्या मते रात्रीचे जेवण ८ वाजण्यापूर्वी घेणे शरीरासाठी चांगले आहे. रात्री ९ नंतर जेवण केल्याने सेरेब्रोवास्कूलरसारख्या स्ट्रोकचा धोका २८% नी वाढतो.
विशेषतः महिलांमध्ये रात्रीचे जेवण उशिरा केल्याने हृदयविकाराचा धोका आणखी वाढतो. दिवसाचे पहिले आणि शेवटचे जेवण लवकर खाण्याची सवय लावल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येतो.
हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण
जगात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे संशोधनात म्हटले आहे. २०१९ मध्ये जगातील १.८६ कोटी मृत्यूंपैकी ७९ लाख मृत्यू हे आहारामुळे झाले.
पाश्चात्त्यांचे अनुकरण केल्याने रात्रीचे जेवण उशिरा खाणे किंवा नाश्ता न करणे अशा विविध सवयी वाढल्या आहेत. या सवयी त्वरित सुधारणे आवश्यक आहे.