Water Therapy: दीर्घायुषी व्हायचे असेल तर आजपासूनच 'वॉटर थेरेपी' सुरू करा; वाचा अगणित फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:40 PM2024-04-23T12:40:43+5:302024-04-23T12:44:14+5:30

Health Tips: तुम्ही म्हणाल, पाणी कसं प्यायचं हेही तुम्ही शिकवणार का? तर हो! मात्र ही माहिती आरोग्य तज्ज्ञांकडून आलेली आहे व त्यांनी वॉटर थेरेपीचे अनेक फायदे सांगितले आहे. निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हीही ही थेरेपी आजपासून फॉलो करा आणि अवघ्या २१ दिवसात स्वत:मध्ये बदल अनुभवा. त्यासाठी फार काही वेगळे करायचे नाही तर आपल्या दिनक्रमात करायचा आहे छोटा छोटा बदल!

वॉटर थेरेपी अर्थात पाणी पिण्याची प्रक्रिया! दिवसभरात आपण तहान लागली की पाणी पितो. कधी कधी तर कामाच्या गडबडीत पाणी प्यायचे राहून गेले, हेही आपल्या बाबतीत घडते आणि योग्य प्रमाणात पाणी पोटात गेले नाही की शरीर चक्र बिघडते. ते सुरळीत ठेवण्यासाठी दिवसभरात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

पाणी पिताना आपण सगळ्यात मोठी चूक करतो, ती म्हणजे घटाघटा पाणी पितो. मात्र पाणी घोट घोट घेतच प्यायले पाहिजे. तसेच भांडं उष्ट न करता पाणी पिण्यात शिष्टाचार असला तरी आयुर्वेदानुसार पाणी भांड्याला तोंड लावूनच प्यायले पाहिजे, अन्यथा पाण्याबरोबर हवा पोटात जाते आणि अनावश्यक पोकळी निर्माण होते.

भविष्यात गुडघ्यांचे विकार टाळायचे असतील तर आतापासून बसून पाणी पिण्याचा सराव ठेवा. दरवेळी आपल्याला ते लक्षात येत नाही, म्हणून पाण्याच्या माठाजवळ, फ्रिजजवळ छोटेसे स्टूल ठेवावे, जेणेकरून बसून पाणी प्यायचे आहेत हे लक्षात येईल.

झोपेतून उठल्यावर चूळ भरण्याआधी निदान चार भांडी ते १ लिटर, आपल्या क्षमतेनुसार पाणी प्यायले पाहिजे. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर मलासनात अर्थात भारतीय पद्धतीने शौचास बसतो त्याप्रमाणे बसून पाणी प्यायले पाहिजे. सकाळी कोमट पाणी पिणे केव्हाही चांगले. त्यात लिंबाचा रस, मध घालणे हे आरोग्यानुसार आणि आवडीनुसार ठरवावे.

जेवताना पाणी पिण्याऐवजी जेवणाआधी २० मिनिटं आणि जेवणानंतर २० मिनिटांनी पाणी प्यावे. त्यामुळे भुकेच्या वेळी उद्दीपित झालेला जठराग्नी मंदावणार नाही आणि पचन वेळेत घडेल.

भरपूर पाणी प्या असे वारंवार कानावर पडत असले, तरी शरीराची गरज ओळखूनच पाणी पिणे हितावह ठरते. कारण गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याने शरीरातील सोडियम कमी होऊन मूत्रपिंडावर ताण येण्याची शक्यता असते.

अशा प्रकारची वॉटर थेरेपी केल्यामुळे आपली त्वचा तुकतुकीत होते, शरीर यंत्रणा सुरळीत होते आणि आजारांची लागण होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर वजन कमी होण्यास मदत होते आणि नियंत्रणात राहते. जपानी लोक या थेरेपीचा वापर करतात आणि दिर्घायूषी होतात. चला तर आपणही या थेरेपीचा अवलंब करूया.