Tips for Sound Sleep: झोप का उडते?, कमी झोपल्याचे दुष्परिणाम काय?... जाणून घ्या, शांत झोपेसाठी सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 04:14 PM2021-06-28T16:14:36+5:302021-06-28T16:23:22+5:30

Coronavirus Mobile Good Sleep : कोरोनामुळे अनेक जण घरून काम करत आहेत. तर अनेकांच्या दैनंदिन कामामध्येही मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे.

सव्वा वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेकदा विरंगुळा म्हणून लोक मोबाईलचा वापर करताना दिसतात. परंतु मोबाईलच्या अती वापरामुळे अनेकांची झोप उडाली असून, निद्रानाशाची समस्या उद‌्भवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू केले होते. दोन ते तीन महिने उद्योग, व्यवसाय ठप्प होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात आले. पुन्हा या वर्षी दोन ते तीन महिने कडक निर्बंध लागू करण्यात आले होते.

वर्षभरातील पाच ते सहा महिने व्यवसाय, उद्योग नसल्याने नागरिक घरातच थांबून होते. सर्वसामान्य व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. घरात थांबावे लागल्याने अनेकांनी विरंगुळा म्हणून मोबाईलचा वापर वाढविला आहे; तर लहान मुलांचा अभ्यासक्रमही ऑनलाईन झाल्यामुळे मुलांमध्येही मोबाईल वापराचे प्रमाण वाढले आहे.

रात्री उशिरापर्यंत मोबाईल हाताळल्यामुळे पुरेशी झोप होत नसल्याने निद्रानाशाची समस्या लहान मुले तसेच तरुण वर्गालाही जाणवू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निद्रानाशामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अपुऱ्या झोपेमुळे मधुमेह, थायरॉईड, कॅन्सर, मानसिक आजार होण्याचा मोठा धोका असल्याने मोबाईलचा वापर मर्यादित करावा, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

आपली झोप उडण्याचीही अनेक कारणं आहेत. मेलानिन संप्रेरक कमी झाल्याने निद्रानाशाची समस्या उद‌्भवत असते. डोमामाईन रसायन कमी झाल्याने झोप लागत नाही. रात्री झोपण्यापूर्वी तेलकट व पचण्यास जड अन्नाचे सेवन केल्यामुळे झोप होत नाही.

बेडरूमचा वापर केवळ झोपण्यासाठी करणे गरजेचे असते. मात्र अनेकजण बेडरूममध्ये जेवण करीत असतात. त्यामुळे झोपेसाठी पोषक वातारण राहत नाही. झोपण्यापूर्वी मोबाईलचा अती वापर केल्याने डोळ्यांवर प्रकाश पडल्याने मेंदूला ॲक्टिव्ह केले जाते. त्यामुळे झोप उडते.

पुरेशा झोपेचे जसे काही फायदे असतात तसंच झोप न मिळाल्यामुळेही मोठी समस्या निर्माण होऊ शकते. शरीराला पुरेशी झोप न मिळाल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते. झोप नसल्याने चिडचिडेपणा वाढतो. लहान मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होतो. मधुमेह, कॅन्सर, थायरॉईडसारखे आजार होऊ शकतात.

तुमच्या वयोगटाप्रमाणे तुम्हाला तितकी झोपही मिळणे आवश्यक आहे. नवजात बाळ १६ ते १८ तास झोप मिळणे आवश्यक आहे. तर शाळेत जाणाऱ्या मुलांना १०-१२ तास. २१ ते ४० वयोगटातील लोकांना ७ ते ९ तास, तसेच ४१-६० आणि ६१ पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना ७-९ तास झोप मिळणं आवश्यक असते.

झोपण्यापूर्वी मधूर संगीत ऐकणं, रात्री जड अन्न खाणे टाळणे, झोपण्याआगोदर दोन तास मोबाईल दूर ठेवणे आणि सकाळी व्यायाम व योग केल्यानं झोपही चांगली लागते आणि प्रकृतीही उत्तम राहण्यास मदत होते.

शरीराला व्यायाम, योगा तसेच सकस आहाराइतकीही पुरेशी झोप गरजेची असते. झोप झाली तरच शारीरिक व मानसिक संतुलन राखले जाते. झोप नसल्यामुळे लहान मुलांमध्ये निद्रानाशाची समस्या उदभवत आहे. झोप न लागल्यामुळे चिडचिडेपणा, मानसिक आजारासह मधुमेह, थायरॉईड, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात, असं मनोविकार तज्ज्ञ डॉ. महेश कानडे यांनी सांगितलं.

Read in English