'या' लोकांनी चुकूनही करू नये चिया सीड्सचं सेवन, आरोग्यासाठी पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:27 IST2024-11-18T15:08:32+5:302024-11-18T15:27:22+5:30
chia seeds : अनेकांना हे माहीत नसतं की, चिया सीड्स काही लोकांसाठी नुकसानकारकही ठरू शकतात.

चिया सीड्समध्ये भरपूर वेगवेगळे पोषक तत्व असतात. ज्यांचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. याने वजन कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे भरपूर लोक याचं सेवन करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, चिया सीड्स काही लोकांसाठी नुकसानकारकही ठरू शकतात. अशात आम्ही सांगत आहोत की, चिया सीड्सचं सेवन कुणी टाळावं.
ज्यांना एलर्जी आहे
काही लोकांना चिया सीड्सपासून एलर्जी होण्याचा धोका असतो. एलर्जी झाल्यावर त्वचेवर लाल चट्टे, सूज, खाज, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या होऊ शकतात. अशात तुम्हाला चिया सीड्स किंवा कोणत्या बियांपासून एलर्जी असेल तर यांचं सेवन करू नका.
पचनासंबंधी समस्या
चिया सीड्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जास्त प्रमाणात फायबरचं सेवन करण्यास पोटात वेदना, बद्धकोष्ठता किंवा जुलाबसारख्या समस्या होऊ शकतात. जर तुम्हला पचनासंबंधी समस्या असेल जसे की, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS), असेल तर चिया सीड्सचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
किडनीची समस्या
चिया सीड्समध्ये ऑक्सालेट भरपूर प्रमाणात असतं. ऑक्सालेटची किडनीमध्ये स्टोन बनवण्यात मोठी भूमिका असते. जर तुम्हाला किडनीची काही समस्या असेल किंवा किडनीमध्ये स्टोन असेल तर चिया सीड्सचं सेवन करू नये.
रक्ताचं औषध
चिया सीड्समध्ये व्हिटॅमिन के चं प्रमाण फार जास्त असतं. व्हिटॅमिन के रक्त घट्ट करण्यास मदत करतं. अशात जर तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी काही औषध घेत असाल तर चिया सीड्सचं सेवन करू नये.
डायबिटीस असेल तर
चिया सीड्स ब्लड शुगरची लेव्हल कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसची औषधं घेत असाल तर चिया सीड्सचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गर्भवती महिला - लहान मुले
गर्भावस्था आणि ब्रेस्टफीड दरम्यान चिया सीड्सचं सेवन करणं तुमच्यासाठी सुरक्षित नसतं. अशात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच लहान मुलांना सुद्धा चिया सीड्स देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.