CoronaVirus News : २ हजार औषधांच्या चाचणीनंतर आता ३ नवी औषधं कोरोनाला हरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:42 AM2020-05-20T10:42:10+5:302020-05-20T10:53:44+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरातून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत असताना सर्वच देशातील शास्त्रज्ञ लसी आणि औषधं तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरसचे उपचार करण्यासाठी कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. दरम्यान पुण्यातील फार्मा कंपनीने कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरत असलेली औषधं शोधण्याचा दावा केला आहे. २ हजार २०० औषधांवर परिक्षण केल्यानंतर या कंपनीने तीन औषधं शोधली आहेत.

नोवालिड कंपनीच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या उपचारांसाठी जवळपास २ हजार २०० औषधांवर प्रयोग करण्यात आला आहे. त्यानंतर यातून कोरोनाच्या संक्रमणाला मात देऊ शकत असलेल्या ४२ परिणामकारक औषधांची निवड करण्यात आली.

कंपनीतील संशोधकांच्यामते ही तीन औषधं कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी ठरतील. या औषधांमध्ये हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनचा समावेश नाही. नोवलिड फार्माच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांची माणसांवर चाचणी करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआई) कडून परवानगी घेण्यात आली आहे.

कंपनीने २५ मार्चपासूनच कोरोनाच्या उपचारांसाठी कोणती औषध परिणामकारक ठरतील याचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. यादरम्यान कोरोनाप्रमाणे इतर संक्रमणांना रोखत असलेल्या २ हजार दोनशे औषधं निदर्शनास आली. यातून सगळ्यात प्रभावी औषधांचा शोध घेणं कठीण होते. अशी माहिती तज्ञांनी दिली.

नोवालिट फार्मा कंपनीचे २० संशोधक दीर्घकाळ या संशोधनासाठी प्रयत्न करत होते. २ हजार दोनशेमधून ४२ औषधं शोधून नंतर तीन प्रभावी औषधांवर परिक्षण करण्यात आलं. या औषधांचे लवकरच माणसांवर परिक्षण होणार आहे.