व्यवस्थित दात घासत नसाल तर कमी होऊ शकते रोगप्रतिकारकशक्ती, 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:06 AM2020-05-21T11:06:21+5:302020-05-21T11:22:19+5:30

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेच आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि मृतांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता खबरदारी बाळगणं गरजेंच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध माध्यामातून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कसा आहार घ्यायला हवा. कोणत्या नियमांचे पालन करायला हवं याबाबत जनजागृती केली जात आहे.

डॉक्टर नेहमीच काहीही खाल्यानंतर दात घासण्याचा सल्ला देतात. कारण काहीही खाल्यानंतर ब्रश केल्यामुळे कॅव्हिटीजचा धोका नसतो, तोंडातून दुर्गंधी येत नाही. अनेक आजारांपासून तुम्हाला वाचता येऊ शकतं. तुम्हाला कल्पनाही नसेल पण व्यवस्थित दात घासले नाही तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते.

 दात न घासणं हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. कारण त्यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे दात खराब होऊन गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचं असेल तर रोज चांगले दात घासण्याची सवय लावून घ्या.

दात व्यवस्थित न घासल्यामुळे सगळ्या वयोगटातील लोकांना आजारांचा सामना करावा लागू शकतो. एका रिपोर्टनुसार ५ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांमध्ये दात खराब होण्याची समस्या जास्त उद्भवत आहे. त्यासाठी दिवसातून दोनवेळा ब्रश करणं गरजेचं आहे.

दात घासताना स्वच्छ पाण्याचा वापर करा. ब्रश ठराविक वेळेनंतर बदलत राहा. साधारणपणे लहान मुलं ब्रश करायला कंटाळा करत असल्यामुळे त्यांना दातांच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी घरातील लहान मुलांना काहीही खाल्यानंतर तसंच उठल्यावर आणि झोपण्याआधी ब्रश करणं गरजेच आहे.

रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवायची असेल तर आहारासोबतच दातांच्या आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे.