पावसाळ्यात माश्यांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्याचे एकापेक्षा एक खास उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:39 PM2022-06-17T12:39:27+5:302022-06-17T12:49:10+5:30

How to get rid from Flies : माश्या अन्नावर, पाण्यावर बसल्यास ते दुषित करतात आणि यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. मग पावसाळ्यातील आजारपणांपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स नक्की वापरा.

पावसाळ्यात निसर्गाचं रुपडं बदलतं, वातावरण आल्हाददायक होते मात्र या दिवसात साचलेल्या पाण्यावर मच्छर, माश्या, कीटकदेखील घरात येतात. माश्या उपद्रवी वाटत नसल्या तरीही त्यांच्यामुळे सुमारे 60 विविध आजार पसरण्याची शक्यता असते. माश्या अन्नावर, पाण्यावर बसल्यास ते दुषित करतात आणि यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. मग पावसाळ्यातील आजारपणांपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स नक्की वापरा.

कापूर - सर्व प्रथम कापूर बारीक करून तेलात मिसळा. दळण्यासाठी किंवा कुस्करण्यासाठी डिस्पोजेबल कप वापरा. अन्यथा त्याचा सुगंध भांड्यात राहील. आता कापूरमध्ये तेल घाला. तमालपत्र तोडून भांड्यात ठेवा. त्यात कापूर आणि तेलाचे मिश्रण मिसळा. आता ते गॅसवर ठेवा आणि नंतर गॅस बंद करा जेणेकरून हे मिश्रण हळू हळू जळून धूर होईल. कोणत्याही बंद खोलीत 5 मिनिटे ठेवा. या धुरामुळे माश्या, डास, कीटक इ. पळून जातील. तुम्ही हे रोज संध्याकाळी करू शकता.

बोरिक अॅसिड - थोडे पीठ, साखर, बोरिक ऍसिड, तेल हे सर्व एकत्र करून पीठ मळून घ्या. बोरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असेल अशा पद्धतीने मळून घ्यावे. आता त्याचे छोटे गोळे बनवा आणि स्वयंपाकघरातील सिंकखाली किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवा जिथे जास्त किडे येतात. किडे ते खातील आणि नंतर परत येणार नाहीत.

घरगुती औषध - पाणी, 3-4 चमचे पांढरे व्हिनेगर, 1 टीस्पून कापूर, थोडेसे डेटॉल, 1 टीस्पून मीठ, स्प्रे बाटली घ्या. या सर्व गोष्टी मिसळा, चांगले हलवा आणि स्प्रे बाटलीत साठवा. आता हे कापड किंवा कापसाच्या बॉलमध्ये फवारून घ्या आणि जिथे कीटक जास्त येतील तिथे वापरा. जर तुमच्या घरात पाळीव प्राणी किंवा मुले असतील तर त्यांची थोडी काळजी घ्या आणि जर नसतील तर थेट दररोज फवारणी देखील केली जाऊ शकते. त्याच्या वासानं किडे आणि उंदीर पळून जातील.

किचनमधील ओटा स्वच्छ ठेवा : घरातील ज्या ठिकाणी जेवण बनवले जाते ती जागा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. याकरिता चांगल्या डिसइंफेक्ट सोल्युशनचा वापर करा. ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने ओटा स्वच्छ ठेवा.

कचरा योग्यरित्या टाका : घरातील कचर्‍याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावणे गरजेचे आहे. त्यासाठी बंद किंवा झाकण असलेले डस्बिन (कचरापेटी) वापरा. कचर्‍यावर माश्यांची वाढ होते. त्यामुळे घरातील कचरा वेळीच बाहेर टाका.

अन्न झाकून ठेवा : घरातील अन्न झाकून ठेवा. तसेच फळं, कापलेल्या भाज्यादेखील फार वेळ उघड्या ठेवू नका.

घरातील झाडांची काळजी घ्या : घरातील झाडांची पुरेशी काळजी घ्या. त्यांना अतिप्रमाणात पाणी घालू नका. सुकलेली पानं, कचरा वेळीच साफ करा.

खिडक्यांना जाळी लावा : घरातील कीटक, माश्या, मच्छर येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा. यामुळे तुम्ही खिडक्या अधिक वेळ उघड्या ठेवू शकता तसेच मच्छर - माश्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घ्या : घरात पाळीव असल्यास त्यांची विष्ठा तात्काळ स्वच्छ करा. तसेच त्यांना नियमित आंघोळ घालणे आवश्यक आहे. बाहेरून घरात येताना प्राण्यांचे पायदेखील स्वच्छ करा.

तुळस : घरा-घरात किमान तुळशीचं रोप जरूर आढळतं. तुळशीमधील औषधी गुणधर्मासोबत कीटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे. घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो.