वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 06:22 PM2024-06-11T18:22:55+5:302024-06-11T18:37:11+5:30

काही फूड कॉम्बिनेशन्सबद्दल जाणून घेऊया जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

चहासोबत बिस्किट, भजी, समोसा खायला सर्वांनाच आवडतं. बहुतेक लोक या गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेताना वाफाळलेल्या चहाचाही आनंद घेतात, परंतु हे फूड कॉम्बिनेशन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे अगदी बरोबर आहे.

आत्तापर्यंतच्या अनेक रिसर्चमधून असं समोर आलं आहे की चहासोबत तळलेले आणि गोड पदार्थ टाळावेत. अशाच काही फूड कॉम्बिनेशन्सबद्दल जाणून घेऊया जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

TOI च्या रिपोर्टनुसार, लोकांनी चहासोबत बिस्किट, केक आणि चॉकलेटसारखे गोड पदार्थ खाणं टाळावेत. चहामध्ये साखर असते आणि त्यासोबत खूप गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते.

लोकांना यामुळे ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात चहा आणि बिस्किट खाल्ल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स, बीपी, पोटाची चरबी, ॲसिडिटी आणि पचनाच्या इतर समस्याही होऊ शकतात.

चहासोबत समोसे, भजी आणि इतर तळलेले पदार्थ खाणे सामान्य आहे, परंतु तसं करणं टाळावे. चहासोबत तेलकट आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

सुस्त आणि अस्वस्थ वाटू शकते. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून हे कॉम्बिनेशन टाळलं पाहिजे.

दुधात असलेला चहा पिणं देखील हानिकारक आहे. बरेच लोक चहामध्ये दूध मिसळून पितात, परंतु असं करू नये. खरं तर, दुधाचा चहा प्यायल्याने चहामधील पॉलीफेनॉल्स कुचकामी ठरू शकतात.

चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट फायदे कमी होतात. कोणत्याही दुग्धजन्य पदार्थाचं चहासोबत सेवन करणं योग्य मानलं जात नाही. चहामध्ये दूध घालू नये आणि ब्लॅक टी प्यावा, असंही अनेक रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

चहासोबत इतर स्नॅक्सचं सेवन करणंही शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. फायबर किंवा प्रोटीन जास्त असलेले अन्न देखील कॅफिनचं शोषण कमी करू शकतात. यामुळे लोकांना काही समस्या निर्माण होऊ शकतात.

जर तुम्ही चहासोबत हाय प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले तर तुमच्या आरोग्याला त्याचा पुरेपूर फायदा होणार नाही. हे कॉम्बिनेशन देखील टाळले पाहिजे. चहा पिताना आरोग्याची काळजी घ्या.