आयुष्यभर आनंदी आणि निरोगी राहण्याचं रहस्य दडलंय 'या' १० हस्त मुद्रांमध्ये, एकदा करून तर बघा....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 03:12 PM2019-12-05T15:12:14+5:302019-12-05T15:19:52+5:30

मानवी शरीर हे अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. शरीराची आपली एक मुद्रेची भाषा आहे. ज्या केल्याने शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. हस्त मुद्रा चिकित्सेनुसार हात किंवा हातांच्या बोटांनी तयार होणाऱ्या मुद्रांमध्ये आरोग्याचं गुपित लपलेलं आहे. असे मानले जाते की, हाताच्या पोटांमध्ये पंचतत्व आहेत. अनेक ऋषींनी याचा शोध लावला आणि ते यांचा वापर करू लागले. त्यामुळे ते निरोगी रहायचे. तसेच याने शरीरात ज्ञान आणि चेतना जागृत होते. अशाच तुम्हाला निरोगी, शांत, आनंदी ठेवण्यासाठी फायदेशीर १० मुद्रा आम्ही तुम्हाला सांगत आहोत. (All Image Credit : facebook.com/dailymudras)

१) आकाश मुद्रा – यात हाताचे मधले बोट अंगठ्याशी जोडावे. या मुद्रेला शूनी मुद्रा असेही म्हटले जाते. ही मुद्रा दररोज केल्यास शरीर शुद्धीकरण होण्यास मदत मिळते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. तुमचा संवादही या मुद्रेच्या मदतीने सुधारतो. नियमितपणे ३० ते ३५ मिनिटे ही मुद्रा केल्यास लाभ मिळतो.

२) प्राण मुद्रा – करंगळी आणि करंगळीच्या बाजूचे बोट अंगठ्याशी जोडून ही मुद्रा करावी. या मुद्रेने शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो. तसेच रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. मन नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होऊन शरीरात सकारात्मक ऊर्जा येते. याने डोकेदुखी आणि मायग्रेनच्या रुग्णाना आराम मिळू शकतो. ही मुद्रा कमीत कमी १५ ते ४५ मिनिटे करू शकता.

३) कुबेरा मुद्रा – कुबेर मुद्रा केल्याने आपल्यातील आत्मविश्वास वाढतो, असा दावा केला जातो. असेही मानले जाते की, ही मुद्रा केल्यावर कुबेर देवता तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला धन लाभ होतो.

४) सुरभी मुद्रा – ही मुद्रा वात, पित्त, आणि कफ हे शरीरातील तीन दोष दूर करते. याच कारणाने या मुद्रेस त्रिदोष नाशक मुद्रा असेही म्हणतात. या मुद्रेमुळे पचन आणि चयापचय क्रिया सुधारते. आतड्यांच्या रोगांपासून मुद्रेमुळे संरक्षण होतं. तसेच ऍसिडिटीला दूर ठेवण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा होतो. रोज १५ मिनिटे ही मुद्रा करावी.

५) हाकिनी मुद्रा – दोन्ही हातांची बोटे एकमेकांना जोडून ही मुद्रा करायची आहे. ही मुद्रा कराल तर मेंदूची कार्यक्षमता वाढते. उजव्या आणि डाव्या मेंदू मध्ये सहकार्य वाढून मेंदू अधिक प्रभावी पणे काम करतो. ही मुद्रा करताना डोळे बंद करून कपाळाच्या मध्यभागी मन एकाग्र करावे. रोज १५ मिनिटे ही मुद्रा केल्यास फायदा मिळतो.

६) वरुण मुद्रा – सांधेदुखी आणि संधिवातापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही मुद्रा फायदेशीर मानली जाते. ही मुद्रा शरीरातील पाण्याची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. तसेच डोळे आणि केसांच्या आरोग्यासाठीही ही मुद्रा फायदेशीर आहे. रोज १५ मिनिटे ही मुद्रा केल्यास फायदा मिळतो.

७) वज्र मुद्रा – अंगठ्याच्या बाजूचे बोट सोडून सर्व बोटे अंगठ्याला जोडावीत. या मुद्रेमुळे शरीरातील रक्तप्रवाह प्रक्रिया सामान्य राहते. त्यामुळे कमी रक्तदाबाच्या रुग्णांना या मुद्रेचा फायदा होऊ शकतो. रोज १५ मिनिटे हे मुद्रा करावी.

८) नागा मुद्रा – नागा मुद्रेमुळे शारीरिक शक्ती वाढण्यास मदत मिळते. नागा मुद्रा आपलं मन आणि बुद्धी चपळ ठेवते. त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. मानसिक आरोग्यासाठी ही मुद्रा अतिशय महत्वाची आहे. हायपर टेन्शन सारख्या समस्या दूर होण्यास याने फायदा होतो. रोज १५ मिनिटे ही मुद्रा केल्यास फरक दिसून येतो.

९) धर्मचक्र मुद्रा – ही मुद्रा असून ही बौद्ध धर्मातल्या “व्हील ऑफ धर्मा” पासून घेतली आहे. धर्मचक्र मुद्रा मन शांत ठेवण्यास मदत करते आणि शरीराला रिलॅक्स करते. मन आनंदी ठेवण्यास ही मुद्रा खूप उपयुक्त असून सकारात्मक विचार मनात येतात आणि त्यामुळेच जीवनात सकारात्मक बदल घडतात. दररोज १५ मिनिटं ही मुद्रा केल्यास फायदा मिळतो.

१०) पृथ्वी मुद्रा – ही एक मुद्रा अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ही मुद्रा दोन्ही हातानी करावी. या मुद्रेमुळे शारीरिक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच केस गळती, त्वचा रोग, सर्दी, कफ, ताप, लठ्ठपणा, मधुमेह सारख्या असल्यास ही मुद्रा केल्यास फायदा होईल.