By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:13 IST
1 / 5 जिम बॅग, ऑफिस डेस्क, शाळा-कॉलेज किंवा बेडसाइड टेबल...पाण्याची बाटली आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मात्र, आपण रोज ज्या बाटलीतून पाणी पितो, ती बाटली आपल्या आरोग्यावर खोल परिणाम करू शकते, याचा विचार फारच थोडे लोक करतात. बहुतेक वेळा बाटली खरेदी करताना तिचे डिझाइन, वजन किंवा कॅरी करणे सोपे आहे का, याकडे लक्ष दिले जाते. पण ती बाटली कोणत्या मटेरियलची बनलेली आहे, त्यातून पाण्यात हानिकारक रसायने मिसळतात का, किंवा त्यात जंतू वाढू शकतात का, याचा विचार दुर्लक्षित राहतो. अशा परिस्थितीत काच, स्टील, तांबे आणि प्लास्टिक या चार प्रकारच्या बाटल्यांपैकी कोणती बाटली आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आहे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.2 / 5 काचेची बाटली- काचेची बाटली पाण्याची नैसर्गिक चव कायम ठेवते, कारण त्यातून कोणतेही रासायनिक घटक पाण्यात मिसळत नाहीत. काच नॉन-पोरस असल्यामुळे त्यावर बॅक्टेरिया सहज चिकटत नाहीत आणि ती स्वच्छ करणेही सोपे असते. महत्त्वाचे म्हणजे काचेच्या बाटल्या BPA-फ्री असतात. Aquasana च्या अभ्यासानुसार, आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने काचेच्या बाटल्या अधिक सुरक्षित असून स्वच्छता आणि नैसर्गिक चवीसाठी त्या उत्तम पर्याय आहेत. मात्र, या बाटल्या निसरड्या असल्याने हातातून पडण्याचा धोका असतो, विशेषतः प्रवासादरम्यान.3 / 5 स्टीलची बाटली- स्टीलच्या बाटल्या मजबूत, हलक्या आणि इन्सुलेटेड असतात, त्यामुळे पाणी जास्त वेळ थंड किंवा गरम राहते. या बाटल्या नॉन-टॉक्सिक, BPA-फ्री आणि मोल्ड-फ्री असतात. World Steel Association च्या संशोधनानुसार, स्टील हे मायक्रोप्लास्टिक-मुक्त आणि स्वच्छतेच्या दृष्टीने सुरक्षित मटेरियल आहे. मात्र, कमी दर्जाच्या स्टीलच्या बाटल्यांमधून पाण्याला धातूसारखी चव येऊ शकते किंवा योग्य साफसफाई न केल्यास दुर्गंधी निर्माण होऊ शकते.4 / 5 तांब्याची बाटली- तांबा हा नैसर्गिक अँटीमायक्रोबियल घटक असून तो ई.कोलाईसारख्या हानिकारक बॅक्टेरियांना नष्ट करतो. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. Journal of Health, Population and Nutrition मध्ये प्रकाशित अभ्यासात तांब्याच्या बाटलीचे काही आयुर्वेदिक फायदेही नमूद करण्यात आले आहेत. मात्र, तांब्याच्या बाटलीत पाणी फार काळ ठेवल्यास किंवा जास्त प्रमाणात तांबे पाण्यात मिसळल्यास कॉपर टॉक्सिसिटी होण्याचा धोका असतो. यामुळे यकृत व मूत्रपिंडाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच, तांब्याच्या बाटलीत आम्लीय पेये ठेवू नयेत.5 / 5 प्लास्टिकची बाटली- प्लास्टिकच्या बाटल्या सर्वाधिक वापरात असल्या तरी त्या आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक मानल्या जातात. प्लास्टिकमधून BPA सारखी रसायने पाण्यात मिसळू शकतात, जी शरीरात जाऊन हार्मोनल असंतुलन, हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. Concordia University च्या अभ्यासानुसार, प्लास्टिक बाटली वापरल्यामुळे दरवर्षी सुमारे 90,000 मायक्रोप्लास्टिक कण मानवी शरीरात प्रवेश करतात. तर National Institutes of Health (NIH) च्या संशोधनानुसार, प्लास्टिकच्या बाटल्या बॅक्टेरियांसाठी आदर्श ठिकाण ठरतात. त्यामुळे अशा बाटल्यांतून पाणी पिणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.