coronavirus: रशियाचा आपल्याच लसीवर भरोसा नाय? लसीकरणाला केली जातेय टाळाटाळ

By बाळकृष्ण परब | Published: September 21, 2020 01:08 PM2020-09-21T13:08:14+5:302020-09-21T13:28:27+5:30

जगभरातील अनेक संशोधकांनी चाचण्या करण्यापूर्वी लस विकसित केल्याची घोषणा केल्याने रशियाच्या या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रशियाने तेव्हा या सर्व शंका कुशंका फेटाळून लावल्या होता.

संपूर्ण जगभरात कोरोनाविरोधातील लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना ११ ऑगस्ट रोजी रशियाने कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याची घोषणा करत संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता.

त्यावेळी जगभरातील अनेक संशोधकांनी चाचण्या करण्यापूर्वी लस विकसित केल्याची घोषणा केल्याने रशियाच्या या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रशियाने तेव्हा या सर्व शंका कुशंका फेटाळून लावल्या होता. मात्र आता रशियालाही आपण घाईगडबडीत कोरोनावरील लस विकसित केल्याची जाणीव झाल्याचे संकेत मिळत आहेत.

ही लस शरीरामध्ये पुरेशा प्रमाणावर अँटीबॉडी विकसित करण्यात यशस्वी ठरत असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला होता. मात्र एवढे दिवस झाल्यानंतरही रशियामध्ये लसीकरणाची प्रक्रिया बऱ्यापैकी संथ आहे तसेच पुरेशा प्रमाणात लसीसुद्धा तयार करण्यात आलेल्या नाहीत.

रशियामध्ये क्लिनिकल ट्रायलशिवाय अजून मोठ्या लोकसंख्येला कोरोनाची लस देण्यात आलेली नाही, असे येथील आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. मात्र या संथ लसीकरणामागे लसीचे मर्यादित प्रमाणावरील उत्पादन आहे की अप्रमाणित लस मोठ्या लोकसंख्येला एकाच वेळी देण्यापूर्वी काही फेरविचार होत आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ही लस विकसित करणाऱ्या एका कंपनीने सांगितले की, क्रिमियामधील पेनिनसुलासाठी ही लस पाठवण्यात आली आहे. दोन लाख लोकसंख्या असलेल्या या प्रदेशासाठी २१ लोकांसाठीच लस पाठवण्यात आली आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी सांगितले की, काही प्रांतांमध्ये मर्यादित स्वरूपात लस पाठवण्यात आलेली आहे.

मात्र मुराश्को यांनी लसींची संख्या आणि सर्वसामान्यांना ही लस कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकेल, याची माहिती दिली नाही. पण सेंट पीटर्सबर्गजवळील भागात सर्वात आधी नमुना लस पाठवण्यात आल्याचे सांगितले.

दुसरीकडे चाचणी करण्यापूर्वीच लस विकसित केल्याची घोषणा करण्यावर सवाल उपस्थित करणारे रशियन असोसिएट्स फॉर एव्हिडेंस बेस्ड मेडिसिनचे उपाध्यक्ष डॉ. वसीली वेलासोव्ह यांनी सांगितले की, दुर्दैवाने रशियाने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीबाबत आमच्याकडे खूप कमी माहिती आहे.

तर फार्मास्युटिकल ट्रेड ग्रुपच्या संचालक स्वेतलाना जेविदोवा यांनीही या लसीचा मर्यादित वापर ही एक चांगली बाब असल्याचे म्हटले आहे. जेविदोवा यांनीही या लसीच्या घोषणेला विरोध केला होता.

रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी ११ ऑगस्ट रोजी सांगितले होते की, डॉक्टर आणि शिक्षकांसारख्या संसर्गाचा अधिक धोका असलेल्या लोकांना कोरोनाची पहिली लस दिली जाईल. मात्र आता लस उपलब्ध होण्यास उशीर झाल्यानंतर त्यांनी वितरण प्रणालीची तपासणी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यामुळे लस येण्यात उशीर होत असल्याचे सांगितले.

रशियाने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीची प्रायोगिक चाचणी सध्या मॉस्कोमध्ये सुरू आहे. तिथे ३० हजार जणांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. तर १० हजार जणांना प्लेसबो दिला जाणार आहे. तर ही लस सध्यातरी केवळ स्वयंसेवकांसाठीच उपलब्ध आहे, असे मॉस्कोच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्त्या येवगेनिया जुबोवा यांनी सांगितले.