Coronavirus: दिलासादायक! आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?; बाधितांच्या संपर्कात आला तरी धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 08:16 AM2021-10-04T08:16:42+5:302021-10-04T08:26:59+5:30

Coronavirus: संपूर्ण जगात तसेच देशात कोरोना महामारीनं संकट उभं केले आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे.

गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून कोरोना आपल्या सोबतीला आहे. त्याचा पिच्छा सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न करून झाले परंतु कोरोना काही साथ सोडायला तयार नाही. लसीची मात्राही त्याला फार काळ दूर ठेवू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशात कोरोना प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. परंतु लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता कोरोनाला लांब ठेवण्यासाठी एक गोळी विकसित केली जात आहे. जाणून घेऊ याविषयी...

कसे काम करणार ही गोळी? - यंदाच्या मार्च महिन्यात फायझरने या गोळीची चाचणी केली. फायझरची कोरोनाप्रतिबंधक गोळी घेतल्यास संसर्ग होण्याची शक्यताही मावळते. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले तरे कोरोना होण्याचा धोका रहात नाही.

ही गोळी शरीरात गेल्यानंतर प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करते. तसेच सर्व रक्तपेशींना उ्ददिपीत करून बाह्यसंकटापासून संरक्षण देते.

कोण तयार करतंय गोळी? - फायझर ही अमेरिकी कंपनी कोरोनाप्रतिबंधक गोळी तयार करत आहे. त्यासाठी कंपनीकडून चाचण्या सुरू आहेत. कोरोनाला अटकाव करणारी गोळी तयार झाल्यास लसीला एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकणार आहे.

कशी आहे गोळी? -फायझर विकसित करत असलेली अँटिकोरोना गोळी सामान्य गोळीप्रमाणेच असेल. ही गोळी कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी असेल. कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांवेळीच ही गोळी घेतली तर कोरोना आटोक्यात येईल.

सध्या काही गोळ्या किंवा औषधे कोरोनाप्रतिबंधक समजल्या जात असल्या तरी फायझर विकसित करत असलेली गोळी पूर्णत: कोरोनाकेंद्रितच आहे.

नैदानिक चाचणीसाठी...कोरोनाप्रतिबंधक गोळीची चाचणी फायझर २६०० जणांवर केली जाणार आहे. त्यात काही जणांना प्रत्यक्ष गोळी दिली जाईल तर काहींना प्रतिकात्मक औषध दिले जाईल. पाच ते दहा दिवस ही गोळी दिली जाईल. दिवसातून दोनदा असे प्रमाण असेल.

१८ वर्षांवरील लोकांनाच या नैदानिक चाचणीत सहभागी होता येणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील आणि त्यानंतरच गोळीच्या उत्पादनाला मंजुरी देण्यासाठी अमेरिकी एफडीएकडे अर्ज करता येणार आहे.