CoronaVirus News: कोरोनाचे बहुतांश रुग्ण करतात 'या' चुका; प्रकृती आणखी बिघडण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 03:18 PM2021-04-21T15:18:07+5:302021-04-21T15:31:49+5:30

CoronaVirus News: सौम्य लक्षण असल्यानं घरातच उपचार घेणाऱ्या रुग्णांना नेमकी कोणती काळजी घ्यावी...?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे. नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढला असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

गेल्या २४ तासांत देशात जवळपास ३ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर २ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांनी जीव गमावला.

कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही जण पेनकिलर्स आणि एँटीबायोटिक्स घेत आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्लाशिवाय अशी औषधं घेणं धोकादायक ठरू शकतं.

कोरोनाची लागण झाल्यावर अनेक जण घाबरून जातात. रुग्णालयांमध्ये बेडसाठी शोधाशोध सुरू होते. मात्र सौम्य लक्षणं असल्यास घरीच कोरोनावर उपचार शक्य आहेत. एखाद्या आजारानं ग्रस्त असलेल्यांनी आणि वृद्धांनी रुग्णालयात जायला हवं.

सेल्फ आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानं पॅरासिटोमॉल आणि इबुप्रोफेनसारखी औषधं घेऊ शकतात. साधारणत: डॉक्टर कॉम्बिफ्लेम आणि फ्लेक्सॉन सारखी औषधं घेण्यास सांगतात. यामध्ये पॅरासिटोमॉल आणि इबुप्रोफेनचा वापर होतो.

कोरोनामध्ये अनेकांना खोकला येतो. त्यावर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं खोकल्यावरील औषध किंवा कफ सिरप घेऊ शकता. जर तुम्ही पॅरासिटोमॉल आणि इबुप्रोफेनचं कॉम्बिनेशन घेतलं असेल तर याच्या ओव्हरडोसमुळे नुकसान होऊ शकतं.

एँटिबायोटिक्स औषधांनी कोरोनावर उपचार करणं योग्य नाही. एँटिबायोटिक्स कोरोना विषाणूविरोधात प्रभावी नाहीत. अँटीबॅक्टेरियल हँडवॉशदेखील पृष्ठभागावरील विषाणू नष्ट करण्यात परिणामकारक ठरत नाहीत. त्याऐवजी अल्कोहोलचं प्रमाण ६० टक्के असलेल्या सॅनिटायझर्सचा वापर करावा.

कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही जण आयुर्वेदिक किंवा पारंपारिक औषधांचा वापर करतात. या औषधांना शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे अशा औषधांचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्याचं आणि फायबरचं प्रमाण जास्त असलेली फळं खा.

जास्त कॅलरी असलेलं अन्न खाण्याच्याऐवजी जास्त फायबर असलेलं अन्न खा. फायबरचं प्रमाण अधिक असलेली फळं आणि त्यांचा रस घ्या.

सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखरेचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाऊ नका. याचा थेट परिणाम बीएमआयवर होतो. गेल्या वर्षी मृत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण बीएमआय अधिक असलेल्यांचं होतं.