coronavirus: केवळ या एका लक्षणामुळे समजू शकतो कोरोना आणि सामान्य तापामधील फरक

By बाळकृष्ण परब | Published: October 12, 2020 03:41 PM2020-10-12T15:41:35+5:302020-10-12T16:00:34+5:30

coronavirus News : सर्वसाधारणपणे सामान्य तापांमध्ये न दिसणारे एक लक्षण कोरोनामध्ये दिसून येते. या लक्षणावरून कोरोना आणि सामान्य ताप यांच्यामधील फरक जाणून घेता येऊ शकतो.

थंडीताप आणि कोरोना हे वेगवेगळ्या विषाणूंपासून होणारे आजार आहेत. मात्र या सर्व आजारांची लक्षणं सारखीच दिसत असल्याने नेमका ताप कुठला आहे, याचा अंदाज घेणे कठीण होऊन बसते. कोरोनाचा संसर्ग झालेल्या बहुतांश लोकांमध्ये तीव्र ताप, सातत्याने खोकला, वास आणि चव जाणे यासारखी लक्षणे दिसून येतात. मात्र सर्वसाधारणपणे सामान्य तापांमध्ये न दिसणारे एक लक्षण कोरोनामध्ये दिसून येते. या लक्षणावरून कोरोना आणि सामान्य ताप यांच्यामधील फरक जाणून घेता येऊ शकतो.

३७.८ डिग्री सेल्सियस किंवा यापेक्षा अधिक तापमान हे शरीरासाठी उच्च तापमान आहे. असे केवळ शरीरात कुठलाही संसर्ग झाल्यानंतर दिसून येते. केवळ कोरोना विषाणूच्या संसर्गामध्येच असं होतं, असं नाही. मात्र ताप आणि अन्य संसर्गामध्येही असे दिसून येते.

३७.८ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा तापमान असलेल्या व्यक्तींना सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिंसच्या म्हणण्यानुसार शरीरातील तापमानाची तपासणी तीन प्रकारे करता येऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे थर्मामीटर तोंडात किंवा काखेत ठेवून तसेच डिजिटल थर्मामीटर कानात घालून शरीराचे तापमान तपासता येते.

थंडी वाजणे, ताप आणि कोरोना या तिघांमध्येही रुग्णाला खोकल्याचा त्रास होऊ शकतो. मात्र कोरोना विषाणूमुळे होणारा खोकला आणि इतर आजारांमधील खोकला यांच्यात मोठा फरक दिसून येतो. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला एक तासाहून अधिक वेळ खोकला येत राहतो. दिवसाच्या २४ तासांमध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा खोकला येऊ शकतो. जर अशा प्रकारे खोकला येत असेल तर कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे.

चव आणि वास घेण्याची क्षमता गमावणे हे कोरोनाचे प्रमुख लक्षण मानले जाते. मात्र असे लक्षण सामान्य थंडीतापामध्येही दिसून येते. अशा परिस्थिती जर अधिक अस्वस्थ वाटत असेल तर कोरोनाची चाचणी करून घ्यावी.

दरम्यान, तज्ज्ञ शिंक येणे हे कोरानाचे लक्षण मानत नाहीत. हे लक्षण केवळ थंडीतापामध्ये दिसून येते. जेव्हा जेव्हा तुम्हाला ताप, शिंका चव आणि वास जाणे अशी लक्षणे दिसतील तेव्हा प्रत्येकवेळी कोराना चाचणी करायची गरज नाही. मात्र शिंकल्यावर बाहेर फेकल्या जाणाऱ्या थेंबांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे शिंकताना नाक आणि तोंडावर टिश्शू, रुमाल किंवा हात ठेवा. तसेच हात स्वच्छ धुवा. कोरोनामध्ये नाक गळण्याचे लक्षण क्वचितच दिसते.

कोरोनाच्या संसर्गामध्ये सौम्य आणि गंभीर अशी दोन्ही प्रकारची लक्षणे दिसून येतात. अनेकदा रुग्णांमध्ये लक्षणेच दिसून येत नाहीत. मात्र असे लोक कोरोनाबाधित असू शकतात. साधारणपणे कोरोनाची लक्षणे पाच दिवसांत समोर येतात. पण अनेकदा यासाठी १४ दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

मात्र या सर्वांमध्ये कोरोनाचे सर्वात गंभीर लक्षण म्हणजे श्वास घेण्यास होणारा त्रास. कोरोनाचा संसर्ग होऊन प्रकृती बिघडलेल्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षण दिसून येते. अशा परिस्थितीत जर कुणाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण सर्वसाधारण तापामध्ये रुग्णाला असा त्रास होताना दिसून येत नाही.