Coronavirus: Omicron रुग्ण २४ तासांतच बनतो कोरोना स्प्रेडर; समोर आलं महत्त्वाचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 09:50 PM2022-01-16T21:50:52+5:302022-01-16T21:56:34+5:30

Coronavirus: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत असून वेगाने अनेकजण संक्रमित होत आहेत.

देश आणि जगात ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमणात जलदगतीनं वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त देशांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

अनेक वैज्ञानिक रिसर्च आणि संशोधनात याचा खुलासा झाला आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना व्हायरसच्या मागील अन्य व्हेरिएंटच्या तुलनेने अधिक पटीने लोकांना संक्रमित करत आहे. आतापर्यंत लाखो लोकांना कोविडची बाधा झाली आहे.

एका रिपोर्टनुसार, ओमायक्रॉन संक्रमित व्यक्ती २४ तासांच्या आत कोरोना स्प्रेडर म्हणजे इतरांना संक्रमित करण्यास सज्ज असतो. या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कांत येणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण होते. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट कमी घातक असला तरी अधिक संक्रमिक करणारा आहे.

डेल्टासह अन्य कोरोना व्हेरिएंट स्प्रेडर बनण्यासाठी २ ते ४ दिवसांचा कालावधी घेतात. अमेरिकेत महामारी नियंत्रण करणाऱ्या एजेन्सीनुसार, कोविड १९ संक्रमित व्यक्ती लक्षणं दिसण्याच्या काही दिवस आणि समाप्तीनंतर काही दिवसांपर्यंत कोरोना संक्रमण वेगाने पसरवतात.

तर ओमायक्रॉन संक्रमित प्रकरणात व्यक्ती एका दिवसांतच कोरोना संक्रमण पसरवण्यासाठी जबाबदार असतो. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, ओमायक्रॉन संक्रमित व्यक्तीमध्ये लक्षणं ३ दिवसांत कमी व्हायला लागतात. तर या व्हेरिएंटच्या संक्रमणानंतर १ दिवसाच्या आत अन्य लोकांना संक्रमित करण्यास मदत होते.

ओमायक्रॉन व्हेरिएंट इतक्या वेगाने संक्रमित होण्यामागं प्रमुख कारण आहे ते म्हणजे इन्क्यूबेशन पीरियड. कोणत्या व्यक्तीला कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्यानंतर आणि लक्षणं दिसेपर्यंत मधल्या काळाला इन्क्यूबेशन पीरियड असं म्हटलं जातं.

डेल्टा व्हेरिएंटच्या या काळात ४ दिवस, अल्फा व्हेरिएंटमध्ये ५ दिवस तर कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये इन्क्यूबेशन पीरियडचा काळ फक्त ३ दिवस इतकाच आहे. त्यामुळे कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन व्हेरिएंट लोकांना वेगाने संक्रमित करत आहे.

याबाबत जॉन हॉपकिंस सेंट ऑफ सिक्युरिटी महामारीचे तज्ज्ञ डॉ. जेनिफर नुजो म्हणतात की, लहान इन्क्यूबेशन पीरियड कुठल्याही व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वेगाने इतरांना संक्रमित करत असल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतं.

कोरोना संबंधित लक्षणं आढळल्यानंतर तात्काळ टेस्टिंग करणं गरजेचे आहे. त्यासाठी कोरोनाची RTPCR चाचणी करणेच योग्य आहे. कारण लॅबमध्ये करण्यात येणारे परीक्षण व्हायरसची ओळख पटवण्यासाठी अधिक संवेदनशील असते. त्यात व्हायरस डिटेक्ट करण्याची क्षमता अधिक असते.

रविवारी (१६ जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे २,७१,२०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांवर पोहोचला आहे