नवं टेन्शन! कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना गंभीर आजार, मृत्यूचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 10:40 AM2020-12-29T10:40:32+5:302020-12-29T11:09:33+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्यने आठ कोटींचा टप्पा पार केला असून कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 81,672,074 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 1,781,505 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाने आणखी एक नवं टेन्शन दिलं आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रिसर्चमधून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनातून ठीक झालेल्या लोकांना एक गंभीर आजार होत आहे.

कोरोना व्हायरसमुळे माणसांना न्युमोथोरॅक्स (Pnumothorax) या आजाराचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या या आजारात रुग्णाची फुफ्फुसं अत्यंत कमकुवत होऊन त्याला छिद्र होऊ शकतं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यावर काहीच ठोस उपाय नसल्याने संशोधक चिंतेत आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांच्या फुफ्फुसात फायब्रोसिस (Fibrosis) झाल्याचं दिसून येत आहे. याचाच अर्थ फुफ्फुसाच्या ज्या भागातून हवा बाहेर पडते, तिथं म्युकसचं जाळं तयार होतं. जेव्हा फायब्रोसिसमध्ये वाढ होते, तेव्हा फुफ्फुसाला छिद्र होण्यास सुरुवात होते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील काही कोरोनाग्रस्तांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. हे सर्व रुग्ण 3 ते 4 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झाले होते, मात्र त्यानंतर या रुग्णांकडून आता फुफ्फुसांच्या फायब्रोसिसची तक्रार येत आहे.

काही रुग्णांना यामध्ये छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या गंभीर आजारामुळे डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोनामुळे तयार झालेले फायब्रोसिस जेव्हा फूटू लागतात तेव्हा फुफ्फुसात न्युमोथेरोक्सला सुरुवात होते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, न्युमोथेरोक्समध्ये फुफ्फुसाच्या बाहेरील चारही बाजू आणि अंतर्गत भाग इतका कमकुवत होतो की त्याची ते बरे होण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये छिद्र पडायला सुरुवात होते.

न्युमोथोरेक्सच्या रुग्णांना छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यात अडथळे, छातीत जडपणा जाणवणे आणि अपचन यांसारख्या समस्या जाणवतात. फायोब्रोसिसमुळे फुफ्फुसांची नवी लेअर एवढी कमकुवत होते की ती हिलींगच्या दरम्यान फाटू लागते.

या रुग्णांना जर योग्य वेळेत उपचार मिळाले नाहीत तर प्रसंगी रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.