'या' कारणामुळे सर्वाधिक पुरूष होत आहेत कोरोना विषाणूंचे शिकार; संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:42 PM2020-07-26T16:42:56+5:302020-07-26T16:59:47+5:30

कोरोना व्हायरसने महिलांच्या तुलनेत पुरूषांना जास्तीत जास्त आपल्या जाळ्यात ओढलं आहे. कोरोनाच्या माहामारीने भारतासह जगभरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण महिलांच्या तुलनेत पुरूषांना जास्त प्रमाणात का होतं. याबाबत तज्ज्ञांनी काही महिन्यांपासून संशोधन सुरू केले आहे.

संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार ४ कोरोना रुग्णांमध्ये दुर्मिळ अनुवांशिक आजार असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्याचे दिसून आले आहे.

न्युयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार चार कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून दिसून आले की, निरोगी पुरूषांनाही कोरोनाचं गंभीर स्वरूपाचं संक्रमण होतं.

या संशोधनासाठी नेदरलँडमधील वेगवेगळ्या कुटुंबातील २१ ते ३२ वर्ष वयोगटातील लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं.

सुरुवातीला त्यांची शारीरिक स्थिती चांगली होती. पण २३ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान यांना कोरोनाच्या संक्रमणामुळे आयसीयुत भरती करण्यात आलं होतं. त्यातील २९ वर्ष वय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

जेव्हा कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जेनेटिक तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांच्यात कमतरता आढळून आली. यामुळेच त्यांच्या शरीरातील पेशी अणु (Interferons) तयार करत होत्या. याचा रोगप्रतिकारकशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी शरीर कोरोनासारख्या विषाणूंचा सामना करू शकत नाही.

तज्ज्ञाांनी दिलेल्या माहितीनुसार ही जेनेटिक समस्या दुर्मिळ आहे. त्यामुळेच कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा या समस्येशी संबंध लावणं कठीण आहे.

या संशोधनातून असं दिसून आलं की अनुवांशिक समस्या असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे शरीर कोरोनाशी सामना करू शकत नाही. मेडिकल जर्नल जामा मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे.

या अभ्यासात रुग्णांच्या ज्या जीन्समध्ये कमतरता आढळून आली ते जीन्स क्रोमोसोम्सवर असतात. पुरूषांमध्ये X क्रोमोसोम्सची एक कॉपी असते. महिल्यांमध्ये दोन असतात. महिलांच्या एक्स क्रोमोसोम्समध्ये त्रुटी असल्यास दुसऱ्या कॉपीने भरून काढता येऊ शकतात.