CoronaVirus : कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णालाही पुन्हा होऊ शकते लागण, अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 01:57 PM2020-04-09T13:57:14+5:302020-04-09T14:38:38+5:30

कोरोना व्हायरसने जगभरासह भारतात सुद्धा थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या भारतात सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्ण ज्या ठिकाणी सापडत आहेत. त्याठिकाणच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांना घरी बसण्याचा सल्ला दिला जात आहे.

भारतात सुद्धा अनेक ठिकाणी कोरोनापासून पूर्णपणे चांगल्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. तरी कोरोनापासून मुक्त झालेल्या लोकांची योग्य प्रकारे काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून त्या व्यक्तीला कोरोनाची लागण पुन्हा होणार नाही. आज आम्ही तुम्हाला कोरोनापासून मुक्त झालेल्या लोकांची घरी काळजी कशी घ्यायची याबाबत सांगणार आहोत. याबाबत मार्गदर्शन न्युयॉर्क टाईम्सने दिले आहे.

कोरोनाव्हायरस रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे, त्यांनाही घरात काही दिवस क्वारंटाइन करण्यात आलं आहे. कोरोनामुक्त झालेली व्यक्ती जेव्हा घरी येते, तेव्हा विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

कोरोनातून प्रकृती चांगली झालेल्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते. त्यामुळे त्यांना मानसिक आधार द्या

त्यांना आहारात द्रवपदार्थ जास्त द्या. त्यांचं तापमान सातत्याने तपासा. सामान्य फ्लूच्या वेळी जर ती व्यक्ती खातपित नसेल, अशक्त झालेली असेल, तिची प्रकृती गंभीर असेल तर तात्काळ डॉक्टरांना कळवा.

कोरोना झालेल्या व्यक्तीपासून किंवा बरे झालेल्या व्यक्तीपासून अंतर बाळगा. त्या रुग्णाला शक्यतो वेगळी खोली द्यावी. शक्य नसेल तर त्या व्यक्तीपासून दूर राहावं, जास्त संपर्कात येऊ नये.

रुग्णाचा वावर असलेली जागा नियमित सॅनिटाईज करावी. घरात मोकळी खेळती हवा असावी.शक्य असल्यास रुग्णासाठी बाथरूमही वेगळं असावं. नाहीतर रुग्णांनी बाथरूम वापरण्याआधी घरातील इतर सदस्यांनी वापरून घ्यावं. हे बाथरूम स्वच्छ करून घ्यावं.

त्या व्यक्तीचा सामान वेगळा ठेवावा. भांडी, टॉवेल, बेड तो वापरत असलेल्या वस्तू वेगळ्या असाव्यात इतरांनी त्या वापरू नये. त्या व्यक्तीने वापरलेल्या सर्व वस्तू सॅनिटाईज करून घ्या.

घरातील सर्व सदस्यांनी मास्क घालावेत आणि या सदस्यांनीही इतरांशी थेट संपर्क ठेवू नये.