Covid Drugs: भारतात CDRI नं शोधलं कोरोनावर नवं औषध; ५ दिवसांत रुग्ण ठणठणीत, वैज्ञानिकांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:19 PM2021-09-15T12:19:41+5:302021-09-15T12:24:34+5:30

Coronavirus: जगात आणि देशात कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी विविध संशोधन सुरू आहेत. त्यात भारतीय औषध संशोधन संस्थेला मोठं यश मिळालं आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसनं गेल्या वर्षभरापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना दहशतीच्या सावटाखाली जगावं लागत होतं. लाखो लोकांचा जीव कोरोना महामारीनं घेतला. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.

त्यात केंद्रीय औषध संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकाने कोरोना नियंत्रणात आणणारं देशातील पहिलं एँटिवायरल ड्रग उमिफेनोविरचा शोध लावला आहे. CDRI चा दावा आहे की, आतापर्यंत १३२ कोरोना रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यात यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.

उमिफेनोविर हे कोरोनाच्या विना लक्षण आणि सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. CDRI च्या वैज्ञानिकानुसार कोविड १९(Covid 19) च्या डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात एँटिवायरल ड्रग उमिफेनोविर चांगला प्रतिसाद देण्याची आशा आहे.

कारण कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट रुग्णांवरही या औषधाचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. CDRI च्या वैज्ञानिकांचा दावा आहे की, ५ दिवसांत व्हायरल लोड पूर्णत: नष्ट करण्यामध्ये उमिफेनोविर औषध महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

CDRI चे संचालक तपस कुंडू यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात CDRI च्या १६ सदस्यांच्या सांगण्यावरुन उमिफेनोविरची चाचणी औषध म्हणून वापरण्यात आली होती. कोरोना रुग्णांवर तीन टप्प्यात ही चाचणी पूर्ण करण्यात आली.

या चाचणीनंतर उमिफेनोविर विना लक्षण आणि सौम्य लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध झालं आहे. या रुग्णांमधील व्हायरसचा परिणाम जवळपास संपुष्टात आणण्यासाठी उमिफेनोविर ८०० एमजीचा डोस ५ दिवस दिवसातून दोनदा घ्यावा लागतो.

उमिफेनोविरचा परिणाम असा झाला की, कोरोना रुग्ण वेगाने बरे होण्यासाठी मदत झाली. उमिफेनोविर चाचणी १८ ते ७५ वयोगटातील रुग्णांवर करण्यात आली. औषध बनवण्याचं टेक्निक गोवाच्या मेडिजेस्ट मैसर्सने केले आहे. लवकरच उमिफेनोविर टॅबलेट आणि सिरपच्या रुपाने बाजारात आणली जाऊ शकते.

उमिफेनोविरची किंमत रुग्णांना परवडेल अशी ठेवण्यात येईल. २० वर्षापासून या औषधाचा वापर रशिया, चीनसह अन्य देशात एन्फ्लूएंजा व निमोनियासारख्या आजारात केला जातो. CDRI चे मुख्य वैज्ञानिक रविशंकर म्हणाले की, कोरोनाच्या उपचारात उमिफेनोविर गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठीही सुरक्षित आहे.

उमिफेनोविर कोविड १९ चे सेल नष्ट करण्याचं काम करते. मानवी पेशींमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्यापासून रोखते. उमिफेनोविरच्या ५ दिवसांच्या औषधाचा खर्च ६०० रुपये इतका आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) नं क्लिनिकल चाचणीचं मूल्यांकन केले आणि आपत्कालीन परवानगीसाठी सौम्य लक्षण असणाऱ्या आणखी रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात सांगितले आहे.

गेल्या २४ तासांत देशात २७,१७६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे.