कोरोना अलर्ट... केवळ वृद्धच नाही; तर आता फिट अन् हेल्दी तरुणही ठरताहेत 'कोव्हीड-19' चे बळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:08 PM2020-03-31T13:08:44+5:302020-03-31T13:29:12+5:30

Coronavirus Alert : इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे स्थिती आणखीनच वाईट झाली आहे. आता मृतांच्या वाढत्या आकडेवारीबाबत एक बाब समोर आली आहे.

कोरोना व्हायरसचं थैमान काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. जगभरात या व्हायरसमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे 3100 पेक्षा अधिक आणि ब्रिटनमध्ये 1400 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेलाय. या देशांमध्ये संक्रमण अधिक वेगाने पसरत आहे.

तर इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे स्थिती आणखीनच वाईट झाली आहे. आता मृतांच्या वाढत्या आकडेवारीबाबत एक बाब समोर आली आहे. आता कोरोनामुळे अनेक फिट अन् हेल्दी तरूणही कोरोनाचे बळी ठरत आहेत.

काह तज्ज्ञांनी असे सांगितले की, जेव्हा जगभरातून हे सांगितलं गेलं की, कोरोना व्हायरसचा वृद्ध लोकांना जास्त फटका बसतो. तेव्हा तरूण मंडळींनी या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने घेतलंय.

अनेक देशातील तरूणांनी लॉकडाउनला न जुमानता पार्टी सुरूच ठेवल्या. यामुळेच कोरोनाचं संक्रमण पसरण्यास मदत झाली. पण आता अशा अनेक केसेस समोर येत आहेत, ज्यात फिट अन् हेल्दी तरूणांचाही कोरोनामुळे जीव गेला.

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, उत्तर लंडनमध्ये राहणारा अॅडम हार्किन्स पूर्णपणे फिट होता. त्याचं वय केवळ 28 वर्षे होतं. पण त्याचं नाव आता कोरोनाने जीव गमावलेल्यांच्या यादीत आलं आहे. त्याला इंड्यूस्ड कोमात ठेवण्यात आलं होतं. पण त्याला वाचवलं जाऊ शकलं नाही. त्याच्या आईनेही हेचं सांगितलं की, तो पूर्णपणे फिट होता.

तर दुसरीकडे भारतीय वंशाची पूजा शर्मा बर्मिंघममध्ये राहत होती. 33 वर्षांच्या पूजाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. एक दिवसांआधीच तिचे वडील सुधीर शर्मा यांचाही कोरोनाने जीव घेतला होता.

असं असलं तरी कोरोना व्हायरसने एकूण मृतांच्या संख्येचं विश्लेषण केलं तर मोठ्या संख्येने वयोवृद्धच असल्याचे दिसते. पण आता कोरोना तरूणांनाही बळी करत आहे. तज्ज्ञांनी तर असा इशारा दिला की, ज्या देशांची आरोग्य सेवा चांगली नाही, तिथे अधिक जास्त लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

अनेक रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, जास्तीत जास्त तरूणांमध्ये कोरोनाची लक्षणे फारच कमी दिसतील तर काहींमध्ये अजिबात दिसणार नाहीत. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महानिर्देशक टेड्रोज ए गेब्रियेसुस हेही गेल्या आठवड्यात म्हणाले होते की, महामारीतून फिट आणि हेल्दी लोकही सुटणार नाहीत. वयोवृद्ध सर्वाधित पीडित होती, पण तरूणांना देखील कोरोना सोडणार नाही.

एका आकडेवारीनुसार, अमेरिकेतील हॉस्पिटल्समध्ये भरती करण्यात आलेल्या 500 रूग्णांपैकी 20 टक्के रूग्ण म्हणजे 100 रूग्ण हे 22 ते 44 वयोगटातील होते.आयसीयूत भरती होणाऱ्या 10 रूग्णांपैकी एक रूग्ण तरूण असतो.

लीड्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च व्हायरस एक्सपर्ट स्टीफन ग्रिफिन यांनी सांगितले की, प्रत्येकालाच धोका आहे. तुम्ही हे सांगू शकत नाही की कोण जिंकेल. लंडनच्या किंग्स कॉलेजमधील संक्रमित रोगांच्या एक्सपर्ट नथाली मॅकडरमॉट म्हणाल्या की, आम्ही 20 ते 39 वयोगटातील लोकांना लोकांना व्हायरसने मरताना पाहिलं.