Corona Vaccine: कोरोनाची लस घेणार का? निम्म्याहून अधिक भारतीय दहशतीत, सर्व्हेतून खुलासा

By प्रविण मरगळे | Published: December 18, 2020 10:26 AM2020-12-18T10:26:45+5:302020-12-18T10:32:45+5:30

२०२० मध्ये कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगात हाहाकार माजवला, कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले तर लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला, कोरोनामुळे जगभरातील जनजीवन ठप्प झालं, मात्र अद्यापही या आजारावर ठोस उपाय आला नाही.

जगभरात कोरोना लसीची चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता बर्‍याच देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू केलं गेलं आहे. ब्रिटन आणि अमेरिकेने मोठ्या प्रमाणात कोरोना लसीचे लसीकरण सुरू केले आहे. याच दरम्यान लोकांना लसीकरण करायला आवडेल की नाही हे बर्‍याच देशांमध्ये एक सर्वेक्षण केले जात आहे. असंच एक सर्वेक्षण भारतातही करण्यात आला आहे.

लाईव्ह मिंटच्या अहवालानुसार दिल्लीतील लोकल सर्कलच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कोरोना लसीकरण करण्यास लोक टाळाटाळ करतात, त्यामागे दोन मुख्य कारणे उघडकीस आली आहेत. पहिले म्हणजे सप्टेंबरनंतर, कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने कमी झाली आहेत तर दुसरे कारण म्हणजे लोक लसीच्या दुष्परिणामांबद्दल चिंतेत आहेत.

वास्तविक, हे सर्वेक्षण १८ हजार लोकांवर केले गेले आहे. गुरुवारी जाहीर केलेल्या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार अनेक भारतीय कोरोनाची लस घेण्यास कचरत आहेत. सर्वेक्षणात असे आढळले आहे की, सुमारे ६९% लोक म्हणाले की, लसीची त्वरित आवश्यकता नाही.

या निवेदनात म्हटलं आहे की, संकोच होण्याच्या काही प्रमुख कारणांमध्ये दुष्परिणाम, घटते संक्रमण आणि कोरोनाने जास्त काही नुकसान होणार नाही असा विश्वास त्या लोकांना वाटतो

केवळ भारतच नाही तर कोरोना लसीबाबत अनेक देशांमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. अमेरिकेच्या व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीत तेथील तरूणांवर सर्वेक्षण केले गेले, ज्यात या लसीचा वापर करण्यास परवानगी घेण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांना लस घेणार का असे विचारले गेले. सुमारे ५० टक्के लोकांनी एकतर उत्तर दिले नाही अथवा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.

जाहीर केलेल्या सर्वेक्षणपत्रानुसार सुमारे ८०० अमेरिकन लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला. ज्यामध्ये ५९ टक्के लोकांनी सांगितले की, ते लस घेण्यास तयार आहेत, तर १८ टक्क्यांहून अधिक लोकांनी कोणतेही अचूक उत्तर दिले नाही.२२ टक्के लोकांनी लस घेण्यास थेट नकार दिला.

या सर्व गोष्टींमध्ये, कोरोना लसींचे परिणाम समोर दिसून येत आहेत. काही लसींचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. अमेरिकेच्या अलास्का शहरातील दोन जणांना फायझरची लस लागल्यामुळे त्यांची तब्येत अवघ्या काही मिनिटांतच खालावू लागली. ते दोघेही आरोग्यसेवा कर्मचारी आहेत आणि त्याच हॉस्पिटलमध्ये काम करतात.

अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग .डमिनिस्ट्रेशनचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना यापूर्वी एलर्जीची रिएक्शन होती त्यांनी ही लस घेणे टाळावे. मध्यमवयीन रूग्णांमध्ये, लसीकरण केल्यानंतर एलर्जीवर उपचार केला जाऊ शकतो.

दुसरीकडे, यूके वैद्यकीय नियामक असे म्हणतात की, ज्यांना अ‍ॅनाफिलेक्सिस आहे, कोणतंही औषध किंवा खाण्याच्या काही गोष्टींशी एलर्जी आहे, त्यांनी फायझर-बायोटेकची कोरोना लस घेऊ नये.