अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढला, सतत चिडचिड करतोय...; पालकांनी आता करायचं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:56 IST2025-02-10T10:51:27+5:302025-02-10T10:56:14+5:30

छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बऱ्याचदा दिसून येते. अनेक मुले, तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात.
त्यामुळे मुलांना राग येत असेल, तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांना शांत करावे, त्यांच्यासोबत वेळ घालवावा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
हल्ली ऑनलाइन गेम्स, मोकळ्या वातावरणात आणि मित्रांसोबत बाहेर न खेळणे, मुलांचा प्रचंड प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाइम आणि टीव्ही-मोबाइलवर पाहिल्या गेलेल्या घातक दृश्यांमुळे मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत आहे. सतत नकारात्मक गोष्टी बघणे, एकटे राहणे आदी कारणांमुळे मुले रागीट होतात.
लहान मुले अनुकरणातून व निरीक्षणातून शिकत असतात. त्यामुळे मुलांचा राग नियंत्रणात ठेवायचा असेल आणि चिडचिड कमी करायची असेल, तर घरातील ज्येष्ठांनी, पालकांनी आपली वागणूक कशी आहे, यावरही लक्ष केंद्रीत करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
आई-वडिलांचा वेळ गरजेचा - आई-वडील मुलांना फारसा वेळ देत नसतील, तर मुले स्वतःला एकटे समजतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट आणि चिडचिडा होतो. मुलांना राग आला, तर त्यांची प्रेमाने समजूत घालायला हवी.
लहान मुलांवर हात उगारणे, त्यांना चिडवणे टाळावे, मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे. याचेही भान पालकांनी ठेवणे आवश्यक आहे
मानसोपचारतज्ज्ञ काय सांगतात ? - घरातील वातावरणाचा मुलांवर प्रभाव पडतो. त्यामुळे हे वातावरण खेळीमेळीचे असावे, आई-वडिलांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्याच्या रागामागील कारणांचा शोध घ्यावा.
मुले मोबाइलवर काय बघतात, याकडे लक्ष द्यावे. अधिकच चिडचिडेपणा, राग येत असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार घ्यावा.
याकडे लक्ष द्या - मुलांच्या रागाला वाईट वर्तवणुकीचे लेबल लावू नका. त्यांना सतत व्यग्र ठेवा. मुलांच्या विविध उपक्रमांचे वेळापत्रक तयार करा. यामुळे गोष्टी स्थिर असल्यास त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
लहान मुले पालकांचं अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी स्वतःचे वेळोवेळी निरीक्षण करणे आवश्यक आहे. आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या काळात पालकांनी मुलांना संयमाचे महत्त्व शिकवणे गरजेचे आहे.