Photo : सहकाऱ्यांची मानवी ढाल, क्रीडा विश्वाच्या प्रार्थना अन् ख्रिस्टीयन एरिक्सेननं मृत्यूलाही दिला चकवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 10:27 AM2021-06-13T10:27:18+5:302021-06-13T10:39:53+5:30

Denmark's Christian Eriksen stable UEFA EURO 2020 - कोपेनहेगन येथे सुरु असलेल्या UEFA EURO 2020 फूलबॉल स्पर्धेत शनिवारी काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला.

UEFA EURO 2020 - कोपेनहेगन येथे सुरु असलेल्या UEFA EURO 2020 फूलबॉल स्पर्धेत शनिवारी काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. डेन्मार्क विरुद्ध फिनलँड अशा या सामन्यात पहिला हाफ संपायला 2 मिनिटांचा भरपाई वेळ सुरू असताना डेन्मार्कचा आघाडीचा खेळाडू ख्रिस्टीयन एरिक्सेन ( Denmark's Christian Eriksen ) एकाऐकी मैदानावर कोसळला अन् स्टेडियमवर स्मशानशांतता परसरली.

मेडिकल एमर्जन्सीमुळे हा सामना काही काळ स्थगित करावा लागला, एरिक्सेन कोसळल्यानंतर सहकारी खेळाडू त्याच्याजवळ त्वरीत धावत आला अन् वैद्यकिय कर्मचारी येईपर्यंत अन्य सहकाऱ्यांनी त्याच्याभवती मानवी ढाल उभी केली.

एरिक्सेनला नक्की काय झालंय? तो कसा आहे? तो जीवंत आहे की नाही? या सर्व चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. डेन्मार्कच्या खेळाडूंनी एरिक्सेनच्या पत्नीलाही मैदानावर बोलावले, तेव्हा क्रीडा विश्वाची धाकधुक आणखी वाढली.

एव्हाना एरिक्सेनसाठी प्रार्थना सुरू झाल्या होत्या. फुटबॉल विश्वाला हा मोठा धक्काच होता. एरिक्सेनला CPR देण्यात आले.. त्याची मृत्यूसोबत झुंज सुरू असताना क्रीडा विश्व त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. त्याचवेळी रॉयटरच्या फोटोग्राफरनं एक सुखद बातमी दिली. स्ट्रेचरवरून मैदान सोडताना एरिक्सेननं हात हलवल्याचे त्यानं सांगितलं.

एरिक्सेन जीवंत आहे हे समजताच टेंशन थोडं हलकं झालं, परंतु त्याची प्रकृती अद्याप सुधारली नव्हती. एरिक्सनला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या संपूर्ण काळात संघातील प्रत्येक खेळाडू मृत्यूचा वार परतवून लावण्यासाठी त्याच्याभवती ढाल बनून ऊभा होता.

युरोपियन फुटबॉल महासंघानं रात्री उशीरा एरिक्सेनची प्रकृती स्थीर असल्याचे जाहीर केलं अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला. सहकारी पुन्हा मैदानावर उतरले अन् फिनलँडसोबतचा अपूरा सामना पूर्ण केला. त्यांना 0-1 अशी हार मानावी लागली असली तरी त्यांच्या एकजुटीनं फुटबॉल या खेळाची जादू पुन्हा जगाला दाखवून दिली

रविवारी सकाळी एरिक्सेनच्या वडिलांनी तो आता ठिक असून तो बोलत असल्याचे सांगितले.