'लव स्टोरी' सिनेमातून रातोरात स्टार बनला होता कुमार गौरव, आजकाल कुठे आहे आणि काय करतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 11:06 IST2022-01-08T10:59:07+5:302022-01-08T11:06:09+5:30
Kumar Gaurav : कुमार गौरवने १९८१ मध्ये 'लव्ह स्टोरी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमामुळे कुमार गौरव रातोरात स्टार बनला होता.

असं म्हटलं जातं की, अपेक्षांचं ओझं नेहमीच व्यक्तीकडून सांभाळलं जात नाही, पण जेव्हा ओझं एका मोठ्या स्टारच्या मुलावर असतं तेव्हा ते आणखी जास्त वाढतं. बॉलिवूडचे जुबली कुमार नावाने प्रसिद्ध राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव कदाचित आपल्या याच अपेक्षांच्या आणि आशांच्या ओझ्याखाली दबला होता.
कुमार गौरवने १९८१ मध्ये 'लव्ह स्टोरी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमामुळे कुमार गौरव रातोरात स्टार बनला होता. या सिनेमाची निर्मिती त्याचे वडील राजेंद्र कुमार यांनी केली होती.
कुमार गौरवचं खरं नाव मनोज तुली आहे. बॉलिवूडचे एकेकाळचे मोठे स्टार दिवंगत राजेंद्र कुमार यांचा ता मुलगा. कुमार गौरव बॉलिवूड स्टार संजय दत्तचा भाओजी सुद्धा आहे. १९८४ मध्ये कुमारने संजयची बहीण नम्रता दत्तसोबत लग्न केलं होतं. कुमार आणि नम्रताला २ मुली आहेत.
त्यानंतर १९८२ मध्ये रिलीज झालेल्या 'तेरी कसम' हाही सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर तो चॉकलेट हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला. त्यादरम्यान त्याने अनेक सिनेमे साइन केले. पण 'तेरी कसम'नंतर त्याचे स्टार, रोमान्स, लवर्स, हम है लाजवाब आणि ऑल राउंडर हे सिनेम फ्लॉप ठरले.
कुमार गौरवचं करिअर लव स्टोरी आणि तेरी कसममुळे जेवढ्या वेगाने वर गेलं होतं, त्यानंतरच्या सिनेमांमुळे तो थेट जमिनीवर आला. कुमार गौरव राजेंद्र कुमार यांचा मुलगा असून आणि सुनील दत्त यांचा जावई असूनही सिने इंडस्ट्रीत त्याला फार यश मिळालं नाही.
१९८२ ते १९८५ पर्यंत त्याचे सिनेमे फ्लॉप झाले. १९८५ मध्ये महेश भट्टच्या जनम आणि १९८६ मध्ये नाव हिट झाले. या सिनेमांमध्ये कुमार गौरवने चांगला अभिनय केला होता. पण त्यानंतर त्याचे सगळे सिनेमे फ्लॉप झाले.
यानंतर १९९३ मध्ये त्याचे वडील राजेंद्र कुमार यांनी त्याच्या करिअरसाठी माधुरी दीक्षितसोबत 'फूल'सिनेमा बनवला होता. पण हाही सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर कुमार गौरवने सिनेमातून ब्रेक घेतला.
कुमारने १९९९ मध्ये काही टीव्ही शो मध्येही काम केलं. त्यानंतर त्याने २००० साली 'गॅंग'सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं होतं. २००२ मध्ये कांटे सिनेमातही दिसला होता. त्यानंतर तो २००४ मध्ये हॉलिवूड सिनेमा 'Guiana 1838' मध्येही दिसला होता.
आता ६१ वर्षीय कुमार गौरव गेल्या १२ वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तो आज एक सक्सेसफुल बिझनेसमन आहे. सध्या कुमार एक कन्स्ट्रक्शन कंपनी चालवतो. ज्याद्वारे देशभरात अनेक प्रोजेक्ट्स सुरू आहेत. आता त्याला बॉलिवूडमध्ये परत यायचं आहे.