'ठिपक्यांची रांगोळी'फेम 'ही' अभिनेत्री उदनिर्वाहासाठी एकेकाळी दिवसाला लाटायची १०० चपात्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:11 IST2023-05-11T13:06:13+5:302023-05-11T13:11:00+5:30

Namrata pradhan: कालांतराने नम्रताच्या घरची परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांच्याकडे वीज बील भरायला पैसे नव्हते.

सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी.

या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे यातील कलाकारांची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते.

सध्या या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री चर्चेत येत आहे. या अभिनेत्रीने एकेकाळी मोठा स्ट्रगल केला आहे.

ठिपक्यांची रांगोळीमधील सुमी साऱ्यांनाच ठावूक आहे. ही भूमिका अभिनेत्री नम्रता प्रधान साकारत आहे.

मालिकेत साध्या,सरळ स्वभावाची सुमी अल्पावधीत लोकप्रिय झाली. परंतु, या सुमीने म्हणजेच नम्रताने एकेकाळी चक्क १०० चपात्या लाटून घरखर्च चालवला आहे.

नम्रता आज अभिनेत्री असण्यासोबतच व्यवसायिकदेखील आहे. तिचं स्वत:चं रेस्टॉरंट आहे.

एका मुलाखतीत नम्रताने तिच्या बालपणावर भाष्य केलं. एकत्र कुटुंबात नम्रताचं बालपण गेलं. त्यावेळी घरखर्चाला आजोबांच्या पेन्शनची मदत व्हायची. मात्र, त्यांच्या निधनानंतर ती बंद झाली. त्यानंतर घरात आर्थिक चणचण जाणवू लागली.

पुढे काकाचं लग्न झाल्यावर तो वेगळा निघाला. त्यामुळे नम्रताच्या आईने घरखर्चाला हातभार म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे नम्रतावर आजी आणि दोन भावंडांची जबाबदारी पडली.

कालांतराने नम्रताच्या घरची परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांच्याकडे वीज बील भरायला पैसे नव्हते. पुढे नम्रता दहावीत होती तेव्हा तिच्या आईचे हर्नियाचे ऑपरेशन झालं. तेव्हा तिने जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली. तिला दिवसाला ९० ते १०० चपात्या लाटायला लागायच्या.

१२ वीत असताना नम्रताने एका ट्रॅव्हल कंपनीतही काम केलं. सोबतच पार्लरचा कोर्स करुन स्वत:चं सॅलॉन सुरु केलं. ज्यामुळे घरात चांगले दिवस आले.

कुटुंबाचा गाडा ओढत असतानाच तिने 2018 मध्ये छत्रीवाली या मालिकेसाठी ऑडिशन दिलं आणि तिची निवड झाली. पुढे तिने मिसेस देशमुख या चित्रपटात काम केले.