अनेकदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला अन् ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला! कोण आहे 'ही' अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:09 IST2025-07-02T16:58:11+5:302025-07-02T17:09:56+5:30

फिनाईल प्यायली, घराच्या छतावरुन उडी मारली अन्...; 'या' अभिनेत्रीने केलेला स्वत: ला संपवण्याचा प्रयत्न! कारण काय ?

अभिनेत्री आरती अग्रवाल हे नाव टॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. जवळपास १५ वर्षे तेलुगू चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या आरतीने साऊथ सुपरस्टार चिरंजीवी, सोनाली बेंद्रेच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. परंतु वयाच्या ३१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्रीचं निधन झालं.

आरती अग्रवालचा जन्म ५ मार्च १९८४ रोजी न्यू जर्सी येथील गुजराती कुटुंबात झाला. तिचे वडील एक यशस्वी व्यापारी होते. या अभिनेत्रीने प्रामुख्याने तेलुगू सिनेमात काम केलं आहे.

दरम्यान, अभिनेत्रीने २००१ मध्ये 'पागलपन' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तसेच साउथ चित्रपट 'नुव्वू नाकू नचाव' हा तिच्या टॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता. आरतीची फिल्मी कारकीर्द खूपच लहान होती. आपल्या करिअरमध्ये तिने चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, रवी तेजा, जूनियर एनटीआर, प्रभास यांसारख्या साऊथच्या अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली.

अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत एकूण २५ चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात तेलुगू, तमिळ आणि हिंदी या तिन्ही इंडस्ट्रीतील चित्रपटांचा समावेश आहे. फिल्मी करिअरबरोबरच आरती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली.

मीडिया रिपोर्टनुसार, आरती अग्रवालने वयाच्या २१ व्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. फिनाईल पिऊन तिने स्वत ला संपवण्याचा प्रयत्न केल्याचाही सांगण्यात येतं. त्याच्यानंतर काही दिवसांनीच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कारण तिच्या हात आणि पायांना गंभीर दुखापत झाली होती. प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यामुळे अभिनेत्रीने घराच्या छतावरुन उडी मारली होती.

त्यानंतर आरतीला लठ्ठपणाचा त्रास होता आणि त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. वाढत्या लठ्ठपणामुळे तिला चित्रपटात काम मिळत नव्हतं.

लठ्ठपणामुळे आरती नैराश्यात गेली होती. म्हणून बारीक होण्यासाठी तिने शस्त्रक्रियेचा आधार घेतला. लठ्ठपणा दूर करण्यासाठी अभिनेत्रीने 'लायपोसक्शन सर्जरी' केली.

सर्जरीनंतर अभिनेत्रीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच आरतीचा मृत्यू झाला. आरतीने वयाच्या ३१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.