"या शिवजयंतीला शपथ घेऊया की..." मर्दानी खेळ सादर करत अश्विनी महांगडेचा छत्रपतींना मानाचा मुजरा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:59 IST2026-02-19T12:50:46+5:302026-02-19T12:59:03+5:30
अश्विनी महांगडेचा करारी अवतार; फोटो पाहून अंगावर येतील शहारे

आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंतीनिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला अशा शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे.

शिवजयंतीनिमित्त अभिनेत्री अश्विनी महांगडेनं साडी परिधान करून अत्यंत कौशल्याने लाठीकाठी आणि तलवार फिरवत मर्दानी खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले. याचे व्हिडीओ आणि फोटो तिनं सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत.

अश्विनीने गडद पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून, तिचा हा पारंपरिक अवतार डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

शिवकालीन मर्दानी खेळ खेळताना करारी नजरेने पाहणाऱ्या प्राजक्ताच्या या रूपातून मराठमोळा बाणा अधिकच उठून दिसत आहे.

गळ्यात ठुशी, कोल्हापुरी साज आणि कपाळी चंद्रकोर या लूकमध्ये अश्विनी प्रचंड सुंदर दिसत आहे.

यासोबतचं अश्विनी महिलांच्या स्वसंरक्षणाबाबत महत्त्वाचा संदेश दिला. तिच्या मते, शिवाजी महाराजांच्या काळात महिला युद्धकलेत पारंगत होत्या. मात्र आजच्या काळातही महिलांनी स्वसंरक्षणासाठी युद्धकला शिकणे ही काळाची गरज आहे.

अश्विनी म्हणाली, "आपल्या लेकी- बाळी तेव्हाच सुरक्षित राहतील जेव्हा त्यांच्या मनगटात असेल ताकद. नुसती शिवजयंती साजरी करून चालणार नाही तर ती साजरी करण्या लायक बनायला हवं", असे म्हणत तिने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे.

अश्विनीनं स्त्रियांच्या मनगटातील ताकदीवर भाष्य केले. ती म्हणाली, "बांगड्या भरणे याचे अर्थ स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळे आहेत बरं. तिच्यासाठी शृंगार आहे बांगडी... त्याच्यासाठी कमजोरपणा आहे बांगडी. असो… जिजाऊ माँ साहेबांनी तेव्हाच दिलं तिच्या मनगटात बळ".

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा संदर्भ देत अश्विनीने आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. ती म्हणाली की, "महाराजांनी स्त्रियांना नेहमीच आदर दिला, सन्मान दिला. पण ते विसरलो आहोत का आपण? आज तिच्या मनगटात ताकद असायला हवी, तिने स्वतः च रक्षण स्वतः करायला हवं... मग या शिवजयंतीला शपथ घेवूया की हो आम्ही तयार राहू. हीच खरी मानवंदना... हर हर महादेव", असे आवाहन तिने महाराष्ट्रातील महिलांना केले आहे.

मर्दानी खेळ ही महाराष्ट्राची प्राचीन युद्धकला आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध झाली. यात तलवार, दांडपट्टा, लाठीकाठी आणि भाला यांसारख्या शस्त्रांचा वापर करून शारीरिक चपळता, मानसिक स्थिरता आणि आत्मसंरक्षण शिकवले जाते.

















