देवानंद यांची नायिका! स्टारडम असं की रस्त्यावर चालणंही झालेलं कठीण; अभिनेत्रीचा शेवट चटका लावणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:56 IST2026-03-02T16:48:22+5:302026-03-02T16:56:26+5:30

साबण्याच्या जाहिरातीने बदललं नशीब, अभिनेत्रीच्या स्टारडमपुढे हिरोही फेल, कोण होती ती?

हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळणं हा नशीबाचा भाग आहे. चित्रपटसृष्टीत कोणाचे नशीब केव्हा फळफळेल किंवा केव्हा रुसेल हे सांगता येत नाही. अशीच कराचीमध्ये जन्मलेली एक सुंदर मुलगी सौंदय स्पर्धा जिंकत चित्रपटसृष्टीत येते आणि मुंबईच्या मनोरंजन विश्वाच्या हृदयाची धडकन होते. या पन्नासच्या दशकातील या सुंदर अभिनेत्रीचे नाव शीला रमानी आहे.

कराची येथे शीला रमानी यांचा जन्म २ मार्च १९३२ ला झाला. माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असतांना शीलाने सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. १९४८ मध्ये मिस मसूरी आणि १९५० मध्ये मिस शिमला या सौंदर्य स्पर्धा जिंकून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

'दिलसे मिलेके दिल प्यार कीजिए' टॅक्सी ड्रायव्हरमधील गाण्यावर ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये नाचणारी अभिनेत्री म्हणून सिनेरसिकांच्या हृदयाची धडकन बनली. या चित्रपटाने तिला इतके स्टारडम दिले की, शीला रमानी एका रात्रीत स्टार झाल्या.

१९५४ मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते चेतन आनंद यांनी शीला रमानी यांना टॅक्सी ड्रायव्हर या चित्रपटात घेतले. यात नायक देवआनंद होते. यानंतर त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीचं करिअबर बहरलं. शीला रमानी यांनी 'नौकरी', 'जोरू का भाई','मंगू ','मीनार' ,'रेल्वे' प्लॅटफॉर्म', 'घमंड',,'गुलाम बेगम बादशाह', 'गुरु घंटाल','अर्पण' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. 'टॅक्सी ड्रायव्हर' या सिनेमातून त्यांना असं स्टारडम मिळालं, की त्यांना रस्त्यावर चालणंही कठीण झालं होतं.

१९६७ मधील 'आवारा लडकी' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यांनी फाळणीनंतर पाकिस्तानमध्येही चित्रपट केले, परंतु तेथील वातावरणामुळे त्या भारतात परतल्या. त्या काळात त्यांनी 'लक्स' साबणाची जाहिरातही केली. त्यानंतर शीला रमानी यांनी प्रख्यात उद्योगपती जल कोवासजी यांच्याशी विवाह केला आणि अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यानंतर अनेक वर्षे ऑस्ट्रलिया, कोलबिंया, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंकेत त्यांचे वास्तव्य होते.

दरम्यान, साल १९८४ मध्ये त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेल्या आणि २००० च्या दशकापर्यंत तेथेच होत्या.पतीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती खालावली तेव्हा त्या भारतात परतल्या. मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात त्या स्थायिक झाल्यात.

अखेरच्या काळात त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते. अखेर मध्य प्रदेशातील मऊ येथे १५ जुलै २०१५ ला अभिनेत्री शीला रमानी यांनी अखेरचा श्वास घेतला.