Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
By कोमल खांबे | Updated: June 4, 2025 08:05 IST2025-06-04T08:00:05+5:302025-06-04T08:05:01+5:30
Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांना लोक मामा का म्हणतात? आणि त्यांना पहिल्यांदा अशोक मामा म्हणून हाक कोणी मारली होती? हे तुम्हाला माहितीये का?

Happy Birthday Ashok Saraf
महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. अशोक सराफ त्यांचा ७८वा वाढदिवस साजरा करत आहे.
गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणारे अशोक सराफ हे प्रेक्षकांचे लाडके मामा आहेत. त्यांना सिनेसृष्टीतही सगळे जण अशोक मामा या नावानेच हाक मारतात.
पण, अशोक सराफ यांना लोक मामा का म्हणतात? आणि त्यांना पहिल्यांदा अशोक मामा म्हणून हाक कोणी मारली होती? हे तुम्हाला माहितीये का?
अशोक सराफ यांनीच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात यामागचा किस्सा सांगितला होता.
अशोक सराफ हे कोल्हापुरात एका सिनेमाचं शूटिंग करत होते. कोल्हापुरात मामा म्हणणं हे मानाचं समजलं जातं.
त्या शूटिंग सेटवर एक कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन सेटवर आले होते. त्यांनी मुलीला अशोक सराफ यांची ओळख अशोक मामा अशी करून दिली होती.
आपल्या मुलीला मामा म्हणायला सांगताना ते कॅमेरामॅनही अशोक सराफ यांना मामा म्हणू लागले. त्यानंतर मग सेटवरील स्पॉटबॉयही त्यांना मामा म्हणून हाक मारू लागले.
त्यानंतर हळूहळू सगळ्यांचेच अशोक सराफ मामा झाले. "लोक मला मामा म्हणतात याचं मला सुख जास्त वाटतं", असं अशोक सराफ म्हणाले होते.