धाराशिव-उस्मानाबाद-धाराशिव; जाणून घ्या नामकरणामागची रंजक गोष्ट अन् नावाचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:56 PM2022-06-30T12:56:07+5:302022-06-30T13:09:30+5:30

चेतन धनुरे/ उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव व्हावे, यासाठी अधिकृतरित्या ६ दशकांपासून लढा सुरु आहे. लढ्याच्या या प्रवासाने अखेर बुधवारी माईलस्टोन गाठला.

उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव व्हावे, यासाठी अधिकृतरित्या ६ दशकांपासून लढा सुरु आहे. लढ्याच्या या प्रवासाने अखेर बुधवारी माईलस्टोन गाठला.

नामांतराचा आग्रह अन् सोबतीला विरोधही होताच. त्यामुळे लटकलेल्या प्रस्तावावरची धूळ अखेर झटकली गेली अन् शहराचे पुन्हा धाराशिव नावाने बारसे झाले.

निजाम राजवटीत उस्मानाबाद शहर हे १९०४ सालापर्यंत नळदुर्ग जिल्ह्यात अंतर्भूत होते. १९०४ नंतर उस्मानाबादला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. निजामाचा शेवटचा राजा मीर उस्मान याचे नाव या शहराला देऊन ते उस्मानाबाद असे केले गेले. तत्पूर्वी या शहराचे नाव धाराशिव असेच असल्याचे अनेक दाखले आढळून येतात.

या गावात प्राचीन काळी धारासूर नावाचा राक्षस वास्तव्यास होता. तो नागरिकांना प्रचंड त्रास देत असे. या राक्षसाचा देवीने वध केला. त्यामुळे देवीला धारासूर मर्दिनी असे नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

या देवीचे मंदिर आजही येथे ग्रामदैवत म्हणून आहे. देवीच्या नावावरुन गावाचे नाव धाराशिव पडले असावे, असे सांगितले जाते.

सन १७२० सालची छत्रपती शाहू महाराज (छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र) यांची सनद आजही उस्मानाबादेतील विजयसिंह राजे यांच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा इतिहास अभ्यासक जयराज खोचरे करतात. ही सनद मोकासदारी संदर्भातील असून, त्यात कसबे धाराशिव असा स्पष्ट उल्लेख दिसून येतो, असेही खोचरे म्हणाले.

उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी खूप जुनी आहे. मात्र, अधिकृतरित्या ही मागणी १९६२ साली रेकॉर्डवर आली. जनरेट्यामुळे तत्कालीन नगरपरिषदेने याबाबत ठराव घेतला होता.

तेव्हाचे नगराध्यक्ष विठ्ठल राजे हे पदावर असताना ३ ऑक्टोबर १९६२ रोजी झालेल्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो मंजूर करुन पुढे शासनाकडे पाठविण्यात आला होता.

१९९५ साली भाजप-शिवसेना युती महाराष्ट्रात सत्तेत आली. यानंतर त्यांच्या कार्यकाळात उस्मानाबाद व औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय पुन्हा पटलावर आला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारने या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, पुढे या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले. उस्मानाबदच्या नामांतराची अडचण नव्हती. औरंगाबादवरुन आक्षेप झाला. न्यायालयीन पाठपुराव्यात पुढे सरकार कमी पडले अन् हा निर्णय रद्द झाल्याचे सेना नेते अनिल खोचरे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतरही यामध्ये नामांतरासाठी आग्रही असणारी शिवसेना सहभागी असल्याने उस्मानाबाद व औरंगाबाद शहरांच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा जोर धरु लागला होता. सातत्याने निवेदने प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला गेला.

यामध्ये नगरपरिषदेचा ठराव तसेच १९०९ च्या इंपेरियल गॅझेटिअर हैदराबाद राज्य या शासकीय प्रकाशनात असलेला धाराशिव असा उल्लेख व महसूलच्या गाव नकाशा रेकॉर्डलाही असलेला धाराशिव उल्लेखाचा संदर्भ देण्यात आला.