ऑफलाइन क्लासेस टाळण्यासाठी विद्यार्थ्यानं 'असं' काही केलं, ज्यामुळं २० जणांचा जीव धोक्यात आला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 12:16 PM2021-12-11T12:16:54+5:302021-12-11T12:21:49+5:30

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट पसरलं आहे. कोरोना महामारीनं अनेकांना बळी पाडलं. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा जीव गेला. या महामारीमुळे जगाची सर्व व्यवस्था ठप्प करुन टाकली. या महामारीचा फटका शिक्षण व्यवस्थेलाही बसला.

कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने शाळा-कॉलेज बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची प्रथा सुरु झाली. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शाळेची संपर्क तुटला. घरुनच विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. पंरंतु याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर विपरित परिणाम घडला.

यातच ओडिशा येथे घडलेल्या एका घटनेने सगळेच हादरले आहेत. याठिकाणी ११ वीच्या विद्यार्थ्याने त्याच्या २० सहकाऱ्यांचा जीव धोक्यात घातला आहे. ऑफलाईन सुरु असलेले कॉलेज टाळण्यासाठी त्याने जो काही पराक्रम केला त्याने मोठा धक्का बसला.

या विद्यार्थ्याने २० सहकारी विद्यार्थ्यांच्या पाणी बॉटलमध्ये किटकनाशक औषध मिसळून त्यांचा जीव धोक्यात टाकला. या प्रकरणाची माहिती मिळताच तात्काळ शाळा व्यवस्थापनाने या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑफलाईन म्हणजे फिजिकल क्लास टाळण्यासाठी विद्यार्थ्याने हा प्रताप केला. या कृत्याने अनेकांचा जीव गेला असता याचा विचारही त्याने केला नाही. या घटनेनंतर ११ वी आणि १२ वीच्या १९ विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीत कीटकनाशक मिसळले होते. त्यावेळी सर्व विद्यार्थी वर्गात उपस्थित होते. आरोपी विद्यार्थी हा नौपल्ली गावचा रहिवासी असून त्याने कामगाव उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेत ११ वी मध्ये प्रवेश घेतला होता.

आरोपीला रंगेहात पकडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. खरं तर, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, या शाळा आणि वसतिगृहात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सोशल डिस्टेंसिंग नियम पाळण्यासाठी आपापल्या बाटल्या वेगळ्या आणि सोबत ठेवण्यास सांगण्यात आले होते

शाळेतील शिक्षक रबी नारायण साहू यांनी सांगितले की, किती विद्यार्थ्यांनी कीटकनाशक असलेले पाणी प्यायले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, निरीक्षणाखाली ठेवलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही गंभीर दुखापत दिसून आली नाही.

या संपूर्ण घटनेत सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे ही दिलासादायक बाब आहे. शाळेतील शिक्षकाच्या म्हणण्यानुसार, आरोपी विद्यार्थ्याने कीटकनाशक मिसळल्याचा गुन्हा कबूल केला असून, चौकशीदरम्यान त्याने जेकाही शाळेच्या व्यवस्थापनास सांगितले त्याने धक्का बसला.

आरोपी विद्यार्थी म्हणाला की, शाळेत सध्या सुट्ट्या नाहीत. यासाठी त्याने ऑफलाइन वर्ग पुढे ढकलण्यासाठी हे पाऊल उचलले. जेणेकरून एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने शाळा प्रशासन सुट्टी जाहीर करू शकेल असा विचार त्याच्या मनात आला.