Surbhi Kumawat Case: 'मला प्रेमच मिळाले नाही'! लव्ह मॅरेज करणाऱ्या पीएनबीच्या बँक मॅनेजरची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 03:17 PM2022-10-05T15:17:50+5:302022-10-05T15:22:04+5:30

तिचे लव्ह मॅरेज झालेले असले तरी तिने या कारणाने आत्महत्या का केली असेल, याचे उत्तर शोधण्यात सोशल मीडिया गुंतला आहे.

राजस्थानची पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजधानी जयपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या मॅनेजरने आत्महत्या केली आहे. यामुळे सोशल मीडियावर वादळ उठले आहे. सुरभि कुमावत ही मार्केटिंग मॅनेजर होती, तिचे लव्ह मॅरेज झाले होते, तरी तिने मला प्रेम मिळाले नाही, असे चिठ्ठीत लिहित आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

तिचे लव्ह मॅरेज झालेले असले तरी तिने या कारणाने आत्महत्या का केली असेल, याचे उत्तर शोधण्यात सोशल मीडिया गुंतला आहे. सुरभी एक बिनधास्त आयुष्य जगणारी मुलगी होती. परंतू तिला पतीमुळे त्रस्त झाल्याने आत्महत्या करावी लागली असे समोर आले आहे. शनिवारी, १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुरभीने गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये मला आनंदी रहायचे होते. परंतू प्रत्येकजण मला त्रास देऊ पाहत आहे. माझा नवरा देखील मला पसंद करत नाही. तो दर दिवशी, दर सेकंदाला मला घाबरवत राहतो. माझ्य़ा आयुष्यातील प्रत्येक श्वास माझ्यासाठी श्राप बनला आहे. आता मी आणखी सहन करू शकत नाही. मला माझ्या आयुष्यात एकाही व्यक्तीकडून प्रेम मिळाले नाहीय. प्रत्येकाने माझा फक्त वापर केला, आता मी थकलेय. माझे काम आणि ऑफिसपासूनही मी कंटाळले आहे, आता बास झाले, असे तिने या सुसाई़ड नोटमध्ये लिहिले आहे.

सुरभी ही मुळची टोंकची होती. ती हुशारही होती. एका इंग्लिश स्पिकिंग कोर्सवेळी तीची ओळख शाहिद अलीशी झाली. तो सहावी पास होता आणि पाणी पुरवठ्याचे काम करत होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध तयार झाले आणि त्यांनी आर्य समाजाच्या रिवाजानुसार लग्न केले. बँक मॅनेजर असल्याने चांगला पगार होता. तिने नुकताच तिच्या पैशांतून फ्लॅट खरेदी केला होता. दोघेही तिथे राहत होते.

सुरभीच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार शाहिद हा तिच्या पैशांवर मौजमजा करत होता. तो काही कामधंदा करत नव्हता. तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याने लग्न केले होते. त्याच्याविरोधात त्यांनी हुंडाविरोधी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी शाहिदला अटक केली आहे. शाहिद हा सुरभीला डॉक्टरकडे नेत होता, तिच्या मर्जीविरोधात तिला औषधे देत होता. वडिलांच्या घरी आल्यावर सुरभीने शाहिद खूप त्रास देत असल्याचे म्हटले होते.

सुरभीचे वडील ओमप्रकाश यांचा आरोप आहे की, तिने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. मात्र, काहीतरी वाईट घडेल म्हणून आम्ही शांत राहिलो होतो आणि सहन करत राहिलो. लग्नानंतर काही दिवसांनीच शाहिद तिला मारहाण करू लागला होता. आमच्याकडे ती तक्रारही करायची. परंतू काही दिवसांनी ठीक होईल असे समजून आम्ही शांत राहिलो. सुरभीचे घर तुटेल म्हणून आम्ही शाहिदला समजवायचे ठरविले होते. परंतू, तिने हे पाऊल उचलले.