प्रत्येक वेळी नवीन सीम, डेटींग ॲपवर नवे खाते, आफताब अनेक मुलींशी करायचा डेट; गुपित झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 11:00 IST2022-11-17T10:51:45+5:302022-11-17T11:00:34+5:30
मुंबईतील श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या 20 हून अधिक मैत्रिणी होत्या अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या 20 हून अधिक मैत्रिणी होत्या अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व मैत्रिणींची ओळख बंबल या डेटिंग अॅपवरून झाली होती. यातील अनेक मैत्रिणी त्याच्या घरी आल्या आहेत. त्यांच्याशी त्याचे जवळचे संबंध होते.

आफताब पूनावाला याने पोलिसांच्या चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे. पोलिसांनी बंबल या डेटिंग अॅपशी पत्रव्यवहार केला आहे. पोलिसांनी अॅप व्यवस्थापनाकडून आरोपीची सर्व माहिती मागवली आहे. या महिलांचीही चौकशी होऊ शकते.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आफताबने बंबल अॅपद्वारेच श्रद्धाशी मैत्री केली होती. त्यावेळी श्रद्धा कॉलेजमध्ये शिकत होती आणि आरोपी कॉल सेंटरमध्ये काम करत होता.

आरोपी आफताब नवीन सिम घेऊन अॅपवर अकाउंट बनवायचा आणि नंतर मुलींशी मैत्री करायचा. प्रत्येक मुलीशी मैत्री करण्यासाठी तो वेगवेगळे मोबाईल सिम वापरत होता.

प्रत्येक सिम तो स्वत:च्या नावावर घेत होता. त्याने दिल्लीतून अनेक सिम खरेदी केले आहेतत. त्याने 20 हून अधिक मुलींशी मैत्री केल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने त्याचा मोबाईल हँडसेट ओएलएक्सवर विकला होता आणि सिम तोडून फेकून दिले होते. त्यानंतर आरोपीने त्याच क्रमांकाचे दुसरे सिम दिल्लीतून घेतले. त्याने दिल्लीत मोबाईल हँडसेट नवीन खरेदी केला होता. तोच फोन सध्या त्याच्याकडे आहे.

याप्रकरणी श्रद्धाचे वडील विकास मदन वाळकर यांनी १५ सप्टेंबर रोजी श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता.

















