Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:28 IST2025-07-14T13:20:14+5:302025-07-14T13:28:43+5:30
Radhika Yadav : टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येनंतरतिची मैत्रीण हिमांशिका सिंह राजपूतने रविवारी इन्स्टाग्रामवर दुसरा व्हिडीओ शेअर केला.

टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येनंतरतिची मैत्रीण हिमांशिका सिंह राजपूतने रविवारी इन्स्टाग्रामवर दुसरा व्हिडीओ शेअर केला. तिने दावा केला की, राधिकाच्या हत्येचा कट तीन दिवसांपासून रचला जात होता. १० जुलै रोजी ती जिममध्ये वर्कआउट करत असताना तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला पण तो तिने उचलला नाही.
व्हिडिओमध्ये हिमांशिकाने आरोप केला आहे की, ती काल राधिकाच्या घरी गेली तेव्हा तिला कळलं की, घटनेच्या तीन दिवस आधी तिच्या हत्येचा कट रचला जात आहे. दीपकने हत्येच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरची व्यवस्था केली होती.
घटनेच्या दिवशी वडिलांनी राधिकाची आई मंजूला दुसऱ्या खोलीत ठेवलं. भावाला काही तरी बहाण्याने घराबाहेर पाठवलं. घरामध्ये असलेल्या पाळीव पिटबुललाही बाहेर बांधलं. त्यानंतर राधिकावर गोळ्या झाडण्यात आल्या.
दीपकचे मित्र राधिकाचं यश पाहून जळायचे. हे लोक दीपक यादवला सांगत असत की, राधिकाने मेकअप करायला सुरुवात केली आहे, छोटे कपडे घालते, तू तिच्या पैशावर जगू लागला आहेस. मुलींना असं कधीपर्यंत मारलं जाईल? असं हिमांशिकाने म्हटलं आहे.
राधिकाच्या इनस्टाग्राम अकाउंटवरील शेवटचा रील २३ मार्च २०२४ रोजी अपलोड करण्यात आलं होतं आणि तिचं अकाउंट खासगी होतं. राधिका यादवचे फक्त ६८ फॉलोअर्स होते. हिमांशिका सिंह म्हणाली की, इतके कमी फॉलोअर्स असलेले अकाउंट रील बनवणाऱ्याचं कसं असू शकतं?
तिने आरोप केला की, राधिकाच्या वडिलांची मानसिक स्थिती चांगली नाही. हिमांशिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत दावा केला होता की ती राधिका यादवची मैत्रीण आहे आणि तिला सत्य माहीत आहे. ती राधिकाला ८-१० वर्षांपासून ओळखते.
राधिकाला तिच्या घरात गुदमरल्यासारखं वाटत होतं कारण तिच्यावर खूप निर्बंध होते. व्हिडिओ कॉलवरही ती कोणाशी बोलत आहे हे सांगावे लागत असे. ती अनेक वर्षांपासून टेनिस खेळत होती आणि तिला फोटो आणि व्हिडीओ बनवायलाही आवडत असे, पण तिच्या वडिलांनी तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं.
हिमांशिकाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राधिकाचा भाऊ रोहित यादव म्हणाला की, त्याची बहीण राधिकावर कोणतीही बंधन नव्हती. जर बंधनं असती तर मुलगी घराबाहेरही पडू शकली नसती.
रोहित यादवने हिमांशिकाचे सर्व आरोप आणि दावे निराधार असल्याचं म्हटलं आहे. रोहितने माध्यमांसमोर येऊन म्हटलं आहे की, त्याचे काका दीपक यादव यांना कोणीही कधीही टोमणे मारले नाहीत.
जर राधिकावर बंधनं असती तर ती देशात आणि परदेशात कधीही टेनिस खेळू शकली नसती. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. राधिका यादवला परदेशातही टेनिस खेळण्यासाठी पाठवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते.
संपूर्ण कुटुंबाने नेहमीच राधिका यादवला पाठिंबा दिला. रोहित यादव म्हणाले की, हिमांशिका सिंह राजपूतचे दावे निराधार आहेत आणि ती असं का बोलत आहे हे त्यांना माहित नाही.