सासरी जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर झाडली गोळी, तीन महिन्यांआधीच केलं होतं कोर्ट मॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:28 PM2021-09-21T16:28:23+5:302021-09-21T16:35:40+5:30

ही हत्या दुसरी कुणी नाही तर तिच्या पतीनेच केली. पत्नी माहेरी आली होती. पती तिच्यावर सोबत चलण्यासाठी दबाव टाकत होता. तिने नकार दिल्यावर पतीने हे कृत्य केलं.

हरयाणाच्या पानीपतमध्ये तीन महिन्यांआधी कुटुंबियांच्या मर्जी विरोधात जाऊन लग्न करणाऱ्या तरूणीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या दुसरी कुणी नाही तर तिच्या पतीनेच केली. पत्नी माहेरी आली होती. पती तिच्यावर सोबत चलण्यासाठी दबाव टाकत होता. तिने नकार दिल्यावर पतीने हे कृत्य केलं.

सासरी जाण्यास नकार दिल्याने माहेरी राहत असलेल्या पत्नीवर पतीने गोळी झाडत तिची हत्या केली. घरमालक आणि आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला घटनास्थळीच धरलं आणि त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाले केलं. महत्वाची बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन कोर्टात लग्न केलं होतं.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत मृत मुस्कान(२१) ची मोठी बहीण रूखसारने सांगितलं की, ते मुळचे पश्चिम बंगालच्या करतारपूर गावातील आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून त्या मनीष कॉलनी सेक्टर २९ पानीपतमध्ये भाड्याने राहत आहेत. शेजारीच आरोपी विजय कुमारही राहतो. तो मुजफ्फरनगरचा रहिवाशी आहे.

तीन महिन्यांपूर्वी विजय आणि मुस्कानने कोर्टात लग्न केलं होतं. यावर विजयच्या कुटुंबियांनी विरोध केला होता. त्यांच्या नाराजीमुळे मुस्कान माहेरी येऊन राहू लागली होती. सोबतच तिने विजयला फोन करून नातं संपल्याचं सांगितलं होतं. एक महिन्यापूर्वीच विजय घरी आला होता आणि मुस्कानला जबरदस्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करत होता. पण ती तयार नव्हती. त्यानंतर सोमवारी तो पुन्हा आला आणि मुस्कानवर सोबत चलण्यास दबाव टाकू लागला होता. जेव्हा तिने जाण्यास नकार दिला तर त्याने मुस्कानच्या डोक्यावर गोळी झाडली. त्यामुळे मुस्कानचा जागीच मृत्यू झाला.

आवाज झाल्याने घरमालक आणि आजूबाजूच्या लोकांनी विजयला धरलं आणि पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर लोकांनी त्याला पोलिसांकडे सोपवलं. त्याच्याकडून ३१५ बोरची एक काडतूस आणि पिस्तुल ताब्यात घेण्यात आली.

कोर्ट मॅरेज केल्यावर पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने गोळी झाडून तिची हत्या केली. प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, तरूणीचे आई-वडील या नात्याच्या विरोधात होते आणि ते तरूणीला पाठवण्यास नकार देत होते. याच कारणामुळे पतीने गोळी झाडली. मृत तरूणीच्या मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. पुढील कारवाई सुरू आहे.