सुनेसह चौघांवर कोयत्यानं सपासप वार, मग मॉर्निंग वॉक; घरी परतून पुन्हा गळे कापले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:37 PM2021-08-26T12:37:27+5:302021-08-26T12:43:27+5:30

अनैतिक संबंधाच्या संशयातून सासऱ्यानं केली सुनेची हत्या; आणखी तिघांना संपवलं

हरयाणातल्या गुरुग्राममध्ये एका व्यक्तीनं चार जणांची निर्घृण हत्या केली. राव राय सिंह असं आरोपीचं नाव आहे. त्यानं पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यानं दिलेली माहिती ऐकून पोलीसदेखील चक्रावले.

राजेंद्र पार्कातील खोली क्रमांक ए-८० मध्ये वास्तव्यास असलेल्या राव राय सिंहला त्याच्या सुनेवर संशय होता. सून आणि घरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरूचे अवैध संबंध असल्याच्या संशयातून हत्याकांड घडलं.

राव राय सिंहनं मध्यरात्री दीड वाजता त्याची सून सुनिता आणि भाडेकरुची पत्नी अनामिकावर कोयत्यानं अनेकदा वार केले. त्यानंतर ४ तासानंतर त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना दिसल्या. तेव्हा राव राय सिंहनं पुन्हा त्यांच्यावर कोयत्यानं सपासप वार केले.

अनामिकाचा पती आणि मुलीला राव राय सिंहनं आधीच संपवलं होतं. यामध्ये राव राय सिंहला त्याची पत्नी बिमलेशनं (५८ वर्षे) साथ दिली. घरात सुरू असलेलं मृत्यूचं तांडव तिनं पाहिलं. पोलिसांनी राव राय सिंहसह तिलादेखील अटक केली आहे.

चार जणांची हत्या रागाच्या भरात अचानक झालेली नसून हा सगळा प्रकार पूर्वनियोजित असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सिंहनं काही दिवसांपासून कट रचला होता. त्यासाठी त्यानं कोयत्याला धार काढून ठेवली होती.

भाडेकरु कृष्ण तिवारीसोबत सुनेचं अनैतिक संबंध होते अशी माहिती सिंहने पोलिसांना दिली. जानेवारी आणि २१ ऑगस्टला कृष्ण आणि सुनिता आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याचंदेखील त्यानं पोलीस चौकशीत सांगितलं.

कृष्ण चारच महिन्यांपूर्वी सिंह यांच्या घरात राहायला आला होता, असा दावा तिवारी यांच्या नातेवाईकांनी केला. तर मुख्य कारण लपवण्यासाठी सिंह सुनितावर आरोप करत असल्याचं सुनिताच्या कुटुंबीयांनी सांगितलं. एक एकरच्या जमिनीवर सिंह यांची नजर होती. त्यातूनत हत्याकांड घडल्याचा दावा सुनिताच्या भावानं सांगितलं.

सुनिताचा पती संध्याकाळी त्याच्या मित्रासोबत राजस्थानला गेला. त्याच रात्री दोन वाजता सिंहने सुनीताच्या बेडरुमचा दरवाजा वाजवला. तिनं दरवाजा उघडताच सिंहने कोयत्यानं तिच्यावर वार केले. त्याचवेळी बिमलेश बाल्कनीतून बेडरुममध्ये घुसली. सुनीता पळून जाऊ नये यासाठी तिनं तिच्या बेडरुममध्ये प्रवेश केला होता.

सुनीता रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना सिंह वर राहत असलेल्या कृष्ण तिवारीच्या खोलीकडे गेला. मुख्य दरवाजा तोडून तो आत शिरला. कृष्णनं पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंहने त्याला खेचून आणत त्याची हत्या केली.

कृष्णची पत्नी अनामिका गयावया करत होती. मात्र सिंहने तिचीदेखील हत्या केली. तिच्या दोन्ही मुलींवरही हल्ला केला. त्यानंतर स्वत:च्या घरी येऊन सिंहने रक्तानं माखलेला कुर्ता धुतला.

यानंतर सिंह नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले. थोड्या वेळानं त्यांनी पोलीस ठाणं गाठलं. त्यांनी हत्यांची कबुली दिली. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही. शिक्षा भोगण्यास मी तयार आहे, असं सिंह यांनी पोलिसांना सांगितलं.

Read in English