१५ व्या वर्षी लग्न अन् २१ व्या वर्षी पतीची हत्या! खोटं रडून फसवणाऱ्या प्रियंकाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:35 IST2026-04-10T12:58:13+5:302026-04-10T13:35:49+5:30
Devkrishna Purohit Case: एका बाजूला प्रेम असल्याचा बनाव आणि दुसऱ्या बाजूला पतीच्या रक्ताने माखलेले हात, अशा दुहेरी भूमिकेत वावरणाऱ्या प्रियंका पुरोहितचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे.

राजोद येथील मसाला व्यापारी देवकृष्ण पुरोहित याची हत्या ही लूटमार नसून, त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने रचलेला एक थंड रक्ताचा कट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

प्रियंकाला आपल्या सौंदर्याचा प्रचंड गर्व होता. ती देवकृष्णला नेहमी रंगावरून हिणवायची. "तू काळा आहेस, तुला कपडे नीट घालता येत नाहीत, मी तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर आहे आणि तू मला डिझर्व्ह करत नाहीस," अशा शब्दांत ती मानसिक छळ करायची. लग्नानंतरही ती कधीच सासरच्या लोकांशी मिळून मिसळून वागली नाही.

देवकृष्ण आणि प्रियंका यांचा विवाह २०१५ मध्ये अवघ्या १५ व्या वर्षी झाला होता. महाराष्ट्रातील पानखेडाची प्रियंकाचा बालविवाह असल्याने ती बालिक होईपर्यंत दोघे वेगळे राहत होते. २०१७ मध्ये प्रियंकाच्या आयुष्यात कमलेश पुरोहित आला आणि तिचे त्याच्याशी प्रेमसंबंध जुळले.

२०२१ मध्ये जेव्हा प्रियंकाला देवकृष्णसोबत राहण्यासाठी पाठवण्यात आले, तेव्हापासून घरात वाद सुरू झाला. ती अनेकदा माहेरला किंवा नातेवाइकांकडे निघून जायची.

प्रियंकाला देवकृष्णपासून कायमची सुटका हवी होती. यासाठी तिने प्रियकर कमलेशच्या मदतीने सुरेंद्र भाटी या सराईत गुन्हेगाराला १ लाख रुपयांची सुपारी दिली. सुरेंद्र हा मुंबईतील एका गोळीबाराच्या प्रकरणात ४ वर्षे जेलमध्ये राहून आला होता.

३१ मार्चला हत्येचा सौदा झाला आणि ५० हजार रुपये ॲडव्हान्स देण्यात आले. ७ एप्रिलच्या रात्री, जेव्हा देवकृष्ण गाढ झोपेत होते, तेव्हा कमलेश बाहेर पाळतीवर राहिला आणि सुरेंद्रने घरात शिरून देवकृष्णवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली.

हत्या केल्यानंतर या घटनेला लूटमारीचे रूप देण्यासाठी प्रियंकाने स्वतःला दुसऱ्या खोलीत कोंडून घेतले आणि घरातील दागिने व रोकड स्वतःच लपवून ठेवली. पोलिसांनी तपास केला, तेव्हा घरात बाहेरून जबरदस्तीने घुसल्याचे पुरावे मिळाले नाहीत.

"माझ्या शांत स्वभावाच्या मुलाचा या प्रियंकाने छळ केला. ती कधीच सासरच्या कामात मदत करायची नाही, तासनतास फोनवर बोलायची. दोन महिन्यांपूर्वी तिने माझ्या मुलाचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला होता," असं देवकृष्णच्या आईने सांगितले.

















