१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:15 IST2025-08-04T16:59:20+5:302025-08-04T17:15:46+5:30

नवी मुंबईतील खारघरमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने कस्टम विभागाचे सीनिअर अधिकारी कृष्ण कुमार यांना अटक केली आहे. कृष्ण कुमार हे सहार एअर कार्गोमध्ये अधीक्षक म्हणून तैनात होते. त्यांच्या अटकेचा फिल्मी स्टाईल ड्रामा घडला आहे.

कृष्ण कुमार यांनी जवळजवळ एक तास सीबीआयला चकवा दिला. कृष्ण कुमार यांच्यावर एका फर्मकडून १०.२ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. कृष्ण कुमार यांनी सामान मंजूर करण्यासाठी 'रेट कार्ड' निश्चित केले होते असा आरोप सीबीआयचा आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी कृष्ण कुमार यांना अटक करून कोर्टासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना ६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. कृष्ण कुमार यांनी आर अँड आय विंग (रमॅगिंग अँड इंटेलिजेंस) च्या मदतीने एका फर्मचा माल थांबवला. त्यानंतर त्यांनी फर्मला एक निनावी ईमेल पाठवला होता.

कृष्ण कुमार यांनी संबंधित फर्मशी व्यवहार केला आणि माल सोडण्यासाठी लाच मागितली. इतकेच नाही तर लाचेच्या रक्कमेतील मोठा भाग वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा लागणार हेदेखील कृष्ण कुमार यांनी तक्रारदाराला सांगितले. आर अँड आय विंग देखील कस्टम विभागाचा एक हिस्सा आहे. या विभागाचे काम गोष्टींची चौकशी करणे आणि गुप्तचर माहिती गोळा करणे आहे हे आहे.

कृष्ण कुमार यांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय आता आर अँड आय शाखेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहे. फर्मसोबत डिलिंग केल्यानंतर त्यांना कृष्ण कुमार यांनी खारघरमधील त्यांच्या कॉलनीबाहेर बोलावले. तक्रारदार तिथे वेळेत पोहचला, कृष्ण कुमारने त्याला कारमध्ये बसण्यास सांगितले. गाडीत त्याने लाचेची रक्कम घेतली आणि तिथून निघून जाण्यास सांगितले.

तक्रारदार वाहनातून खाली उतरल्यानंतर कृष्ण कुमार यांनी त्यांच्या कारचा वेग वाढवला आणि कॉलनीत गेले. त्याचवेळी सीबीआयचे एक पथक त्यांचा पाठलाग करत होते. काहीतरी गडबड असल्याचा संशय कृष्ण कुमारला आला. कृष्ण कुमार कार वेग तसाच कायम ठेवला आणि सोसायटीत आतमध्ये कार फिरवत राहिले.

सीबीआयला चकमा देण्यासाठी कृष्ण कुमार कार इकडे तिकडे फिरवत राहिले, त्याचवेळी संधी साधून पैशांनी भरलेली बॅग एका कोपऱ्यात ठेवलेल्या कचराकुंडीजवळ फेकली. बॅग फेकल्यानंतर तो सोसायटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली.

अचानक सीबीआयच्या पथकाने कृष्ण कुमार यांना अटक केल्यानंतर तिथे गर्दी जमली, सोसायटीतील लोक बाहेर आले. त्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. सीबीआयच्या पथकाने कचरा पेटीत फेकलेली पैशांनी भरलेली बॅगही जप्त केली आहे.

कायदेशीर आयात असूनही कृष्ण कुमार आणि इतर अज्ञात सरकारी अधिकारी लाचेची मागणी करत असल्याची तक्रार सीबीआयला मिळाली होती. त्यांचे रेट कार्ड फिक्स आहे. आयात मालावर किलोनुसार पैसे घेतले जातात. ही लाच त्यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही द्यावी लागते. मी कायदेशीर आयात केली असताना पैसे मागितले जातात असा आरोप तक्रारदाराने सीबीआयकडे केला होता.

तक्रारदाराच्या आरोपानंतर सीबीआयने सापळा रचला, २५ जुलै ते १ ऑगस्ट या काळात कृष्ण कुमार आणि तक्रारदार यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यात डीलबाबत उल्लेख आढळला. कृष्ण कुमारने याआधी ६ लाखांची मागणी केली होती. त्यातील २० हजार केवळ मला मिळतील बाकीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जातील असं त्याने म्हटले होते. यंदा रोखलेले सामान सोडण्यासाठी १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावेळी सीबीआयने त्यांना अटक केली.