Burari Deaths Case: एकाच घरातील ११ जणांनी एकाचवेळी आयुष्य का संपवलं?; पोलिसांनी 'अंतिम सत्य' सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:57 AM2021-10-21T11:57:50+5:302021-10-21T12:02:16+5:30

Burari Deaths Case: दिल्ली पोलिसांनी सादर केला क्लोजर रिपोर्ट; अहवालात अनेक धक्कादायक बाबी

दिल्लीतील बुराडी परिसरात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबानं तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील ११ जणांनी गळफास लावून स्वत:ला संपवलं. या प्रकरणाचा उलगडा करणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं.

एकाच घरात राहणारे ११ जण गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. १ जुलै २०१८ रोजी ही घटना उघडकीस आली. या सामूहिक हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा झाली. कटकारस्थानापासून जादूटोण्यापर्यंत विविध बाजूंनी घटनेचा तपास करण्यात आला.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ११ जणांच्या आत्महत्येचा तपास हाती घेतला. जवळपास ३ वर्ष तपास केल्यानंतर त्यांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. या प्रकरणात कोणतीच गडबड झालेली नाही. तसे कोणतेही पुरावे आढळलेले नाही, असं पोलिसांनी अहवालात नमूद केलं आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालात अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.

१ जुलै २०१८ रोजी एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली. यातील नारायण देवींचा मृतदेह एका लोखंडी ग्रीलला लटकलेल्या स्थितीत सापडला. त्यांच्या डोळ्यावर पट्टी होती आणि हात पाय बांधलेले होते.

नारायण देवींसोबतचे त्यांचे मुलगे भवनेश चुंडावत आणि ललित चुंडावत, मुलगी प्रतिभा, भवनेशची मुलगी सविता आणि त्यांची मुलं नीतू, मोनू, ललितची पत्नी टीना आणि मुलगा शिवम आणि प्रतिभाची मुलगी प्रियंका यांचा समावेश होता.

पोलिसांना घरात एक डायरी सापडली. त्यात आत्महत्या करण्याची संपूर्ण प्रक्रिया लिहिलेली होती. डायरीत जो उल्लेख होता, त्याच स्थितीत पोलिसांना सर्व मृतदेह सापडले. या डायरीतील हस्ताक्षरं तपासून पाहण्यात आली. ती घरातील व्यक्तींचीच असल्याचं ऑगस्ट २०१९ मध्ये सिद्ध झालं.

कुटुंबानं ठरवून सामूहिक आत्महत्या केल्याचं अन्य पुराव्यांमधून उघडकीस आलं. आत्महत्या करण्याआधी सगळ्यांनी त्यांचे फोन सायलेंटवर केले, ते एका बॅगेत भरून ती घरातील मंदिराजवळ ठेवली.

डायरीत आढळून आलेले उल्लेख, त्यातील मजकूर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी लावून घेतलेले फास पाहता, संपूर्ण कुटुंबानं विशिष्ट विधी केल्याचं तपासात आढळून आलं. डायरीतील बहुतांश लिखाण प्रियंका आणि ललितनं केलं होतं.

घराबाहेरच्या एखाद्या व्यक्तीनं संपूर्ण कुटुंबाची हत्या घडवून आणली का, असाही संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्यांनी घराजवळचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. मात्र त्यात कोणीही बाहेरची व्यक्ती घरात येताना दिसली नाही. त्यामुळे यामागे कोणत्याही बाहेरील व्यक्तीचा हात नसल्याचं स्पष्ट झालं.

सायकोलॉजिकल ऍटॉप्सीमधून समोर आलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील ११ सदस्यांनी मृत्यूच्या उद्देशानं हे पाऊल उचलेलं नव्हतं. एक विधी म्हणून त्यांनी संपूर्ण क्रिया केली. विधी पूर्ण झाल्यावर सर्वकाही सामान्य होईल, असा विश्वास त्यांच्या मनात होता.

ललितचे वडील भोपाल सिंह यांचा मृत्यू २००७ मध्ये झाला. पण ते आपल्याशी सातत्यानं संवाद साधत असल्याचं ललितला वाटायचं. वडील आपल्याला एक विधी करायला सांगत आहेत, त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होईल, असं ललितनं कुटुंबीयांना सांगितलं. ललितच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब विधी करण्यास तयार झालं.