बॉयफ्रेंडने लग्नाचं आमिष देत गर्लफ्रेंडला बोलवलं, मित्रांसोबत मिळून केली तिची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:47 IST2022-12-08T15:37:17+5:302022-12-08T15:47:22+5:30

Boyfriend Killed Girlfriend : लुधियाना जिल्ह्यात रसूलपूर गावात 24 वर्षीय जसप्रीत कौरची तिचा प्रियकर परमप्रीत सिंह याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून हत्या केली. ही घटना 24 नोव्हेंबरची आहे.

पंजाबमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बॉयफ्रेंडने लग्न करू असं सांगत गर्लफ्रेंडला बोलवलं आणि आपल्या साथीदारांसोबत मिळून तिची हत्या केली. हत्येनंतर नाल्यात तिचा मृतदेह फेकला. यानंतर नाल्यातून काढून एका खड्ड्यात पुरला आणि वरून मीठ टाकलं. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, केसची पुढील चौकशी केली जात आहे.

रिपोर्टनुसार, लुधियाना जिल्ह्यात रसूलपूर गावात 24 वर्षीय जसप्रीत कौरची तिचा प्रियकर परमप्रीत सिंह याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून हत्या केली. ही घटना 24 नोव्हेंबरची आहे. परमप्रीत सिंहने जसप्रीतला लग्नाचं आमिष देऊ बोलवलं होतं. त्यानंतर जसप्रीत घरातून 12 तोळे सोनं आणि 20 हजार रूपये रोख रक्कम घेऊन त्याच्याजवळ पोहोचली.

दोघेही कारमध्ये बसून जात होते तेव्हाच रस्त्यात एका साथीदाराच्या मदतीने जसप्रीत कौरचा तिच्या ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह त्यांनी एका नाल्यात फेकला, पण जेव्हा दिसलं की, नाल्यात फार पाणी नाही तर त्यांनी मृतदेह दुसरीकडे नेला.

एका फार्मवर मृतदेह नेला आणि दोन आरोपी तिथे पोहोचले. यातील एक आरोपी परमप्रीतचा सख्खा भाऊ होता. त्यांनी मृतदेह एका खड्ड्यात पुरला आणि वरून मीठ टाकलं. त्यानंतर चौघांनी बसून मद्यसेवन केलं आणि आपापल्या घरी गेले.

दुसरीकडे तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून पोलीस तिचा शोध घेत होते. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, मृत तरूणी मोबाइलच्या माध्यमातून तिचा प्रियकर परमप्रीतच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केला तेव्हा त्यांना सगळं समजलं. पोलिसांनी आरोपींना अटक केली. तरूणीचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला.

परमप्रीत हा 21 वर्षांचा तर मृत तरूणी 24 वर्षांची होती. ती त्याची नातेवाईक असल्याचंही समजतं. मृत तरूणी परमप्रीतवर लग्नाचा दबाव टाकत होती. पण आरोपी यासाठी तयार नव्हता.