Asaram Bapu Wealth: कोण सांभाळतेय आसाराम बापूचे १०००० कोटींचे आश्रम साम्राज्य? सर्व आर्थिक नाड्या घेतल्या ताब्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:26 PM2023-01-31T17:26:30+5:302023-01-31T17:33:02+5:30

400 हून अधिक आश्रम, 1500 हून अधिक सेवा समित्या, 17000 हून अधिक बालसंस्कार केंद्रे... आसाराम बापूही आत आणि त्याचा मुलगा नारायण साई देखील... एवढी संपत्ती कोणाच्या ताब्यात गेली...

अनेक मुलींवर बलात्कार करणारा अध्यात्मिक बाबा आसाराम बापूला आज दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून आसाराम आणि त्याचा मुलगा नारायणसाई तुरुंगात खितपत पडले आहेत. असे असले तरी या दोघांचा इन्कम मात्र हजारो कोटींत सुरुच आहे. आसाराम बापुचा हा हजारो कोटींचा डोलारा कोण सांभाळतोय?

400 हून अधिक आश्रम, 1500 हून अधिक सेवा समित्या, 17000 हून अधिक बालसंस्कार केंद्रे, 40 हून अधिक गुरुकुल - तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंचे धार्मिक साम्राज्य 10,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. ट्रस्ट या मालमत्तांची देखरेख करत आहे आणि व्यवस्थापनही करतेय. परंतू या ट्रस्टवर कोण हुकुमत गाजवतेय.

आसाराम किंवा तुरुंगात असलेला त्यांचा मुलगा नारायण साई हे काम करत नाहीएत. तर ही जबाबदारी आता आसाराम बापूंची कन्या भारतश्री पार पाडत आहे. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था आहे. तिचे मुख्यालय अहमदाबादला आहे. भारती आता या ट्रस्टच्या मुख्यालयातून दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करत आहे.

भारतीश्रीचे देखील आयुष्य वादग्रस्तच राहिले आहे. ती देशभर प्रवास करत असते. ३० राज्यांमध्ये आश्रमांचे साम्राज्य पसरलेले आहे. परंतू ती आसारामसारख्या तिथे जाऊन प्रवचने करत नाही. यामुळे ती मीडियाच्या प्रसिद्धीपासून दुर आहे.

2013 मध्ये आसारामला अटक झाली तेव्हा भारती आणि आसारामची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक करण्यात आली होती पण नंतर त्यांची सुटका झाली. 8 वर्षांत भारतीने आसारामच्या सर्वच मालमत्तांवर चांगली पकड मिळविली आहे. तीच या आश्रमांचे खर्च, उत्पन्न पाहते.

भक्तांची संख्या आणि देणगी कमी झाली असली तरी आश्रमातील लोकांचे येणेजाणे काही थांबलेले नाहीय. या लोकांना आसारामला गोवण्यात आल्याचे आजही वाटत आहे. आसारामच्या अटकेनंतर वर्षभरातच भारतीने त्याच्या ट्रस्टचा ताबा घेतला होता.

भाग्यश्री महागड्या कार वापरते. अहमदाबादमधील बाबा आसाराम यांच्या आश्रमाच्या आवारात प्रवचन आणि आरतीला ती उपस्थित राहते. ४८ वर्षीय भारती नाटकीय पद्धतीने प्रवचन देते. नाचते, गाते. तिचे वडील जसे करायचे तसे ती स्वतःला फुलांनी सजवते. आश्रमातील आरती संबंधित उपक्रम दररोज यूट्यूबवर अपलोड केले जातात.

आसाराम याच्या मागणीनुसार भारती हीच आश्रमातून मुलींना त्याच्याकडे पाठवत असे, असाही आरोप भारतीश्री हिच्यावर करण्यात आला होता. अमृत ​​प्रजापती या माजी साधकाने आसाराम भारतीला फोन करायचे असा आरोप केला होता. ती मुलींना गाडीतून आणायची, असे म्हटले होते.

आसाराम बापूंनी ७० च्या दशकात आध्यात्मिक साम्राज्य निर्माण केले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा नारायण साई आसारामच्या भक्तीचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आला होता. परंतू, मुलीने देखील यात लक्ष घालायला सुरुवात केली होती.

15 डिसेंबर 1975 रोजी जन्मलेल्या भारतीने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी दीक्षा घेतली. त्यानंतर चौदा वर्षे ध्यान आणि योगासने केली. तिने एम.कॉम पर्यंत शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते.

भारतीचे लग्न झाले होते, परंतू ते फारकाळ टिकू शकले नव्हते. घटस्फोटानंतर भारतीने आसारामच्या साम्राज्यात लक्ष घातले. ती तेव्हा महिला आश्रमांचे काम पाहत होती. तसेच ती प्रवचनेही द्यायची.