Ambani Bomb Scare: सचिन वाझेच्या कथित गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; NIA च्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 03:40 PM2021-09-08T15:40:10+5:302021-09-08T15:44:45+5:30

Sachin Vaze: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी NIA ने विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.

NIA च्या तपासात परमबीर सिंग(Param Bir Singh) आणि सचिन वाझे(Sachin Vaze) याच्याबाबत मोठे खुलासे झाले आहेत. ईशान सिन्हा नावाच्या सायबर एक्सपर्टकडून NIA दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट उघड झाले आहेत.

परमबीर सिंग यांनी ईशानकडून टेलिग्रामवर जैश उल हिंदद्वारे अंबानी कुटुंबाला आलेल्या धमकीचा मॉडिफाइड रिपोर्ट बनवला होता. हा रिपोर्ट तसाच होता जो दिल्ली स्पेशल सेलला इस्त्राइली दूतावास कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटानंतर बनवण्यात आला होता.

ईशानने त्या रिपोर्टमध्ये बदल करून त्यात अंबानी यांच्या नावाची धमकी देणारा पोस्टर लावून बनावट रिपोर्ट परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन बनवला होता. जेणेकरुन अंबानी यांना मिळालेली धमकी तिहाड जेलमधूनच आली हे सिद्ध होईल. या रिपोर्टच्या बदल्यात ईशानला परमबीर सिंग यांनी ५ लाख रुपये कॅबिनमध्ये बोलवून दिले होते.

दुसरीकडे सचिन वाझेच्या गर्लफ्रेंडने मोठा खुलासा केला आहे. टीव्ही ९ ने केलेल्या दाव्यानुसार सचिन वाझेची कथित गर्लफ्रेंड मीना जॉर्जचं स्टेटमेंट त्यांच्याकडे आहे. ज्यात मीनाने NIA ला दिलेल्या जबाबात हैराण करणारे खुलासे केलेत.

मीनाने NIA ला सांगितले की, ती व्यवसायाने फिमेल एस्कॉर्ट होती. सचिन वाझेसोबत तिचे अनेक वर्षापासून संबंध होते. २०११ मध्ये सचिन वाझे आणि तिची भेट मुंबईतील एका ५ स्टार हॉटेलमध्ये झाली होती. तेव्हापासून वाझे पुन्हा पोलीस सेवेत येईपर्यंत दोघं रोज भेटत होते.

सचिन वाझेच्या सांगण्यावरुन मीना जॉर्जने काही कंपन्या रजिस्टर केल्या होत्या. मुंबई पोलीस सेवेत परतल्यानंतर सचिन वाझेने मीनाला एस्कॉर्टची नोकरी सोडायला सांगितली. त्यानंतर वाझे पोलीस दलात आल्यापासून प्रति महिना ५० हजार रुपये खर्च मीनाला देऊ लागला.

इतकचं नाही तर दोन वेगवेगळ्या वेळी सचिन वाझेने मीनाला ४० लाख आणि ३६ लाख रुपये रोख रक्कम दिली होती. ओबेरॉय हॉटेलमध्ये राहताना हे पैसे सचिन वाझेने पुन्हा तिच्याकडून परत घेतले. NIA ला चौकशीत दोघांच्या संयुक्त लॉकरमध्ये अनेक रोख रक्कम सापडले.

वाझेच्या सांगण्यावरुन मीनाकडून काही कंपन्या रजिस्टर केल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचा व्यवहार पार पडला. तिच्या अकाऊंटला हे पैसे कोण पाठवत होतं ते फक्त सचिन वाझेलाच माहिती आहे. या अकाऊंटचे ब्लँक चेक स्वाक्षरी करून मी सचिन वाझेला द्यायची असं NIA च्या चौकशीत मीनाने कबुल केले.

दरम्यान, मुकेश अंबानी कुटुंबाला धमक्या नवीन नव्हत्या. याआधीही धमकी मिळाली होती. परंतु अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याची माहिती अंबानी कुटुंबाला मिळताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर तातडीने अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी त्यांचा गुजरात दौरा रद्द केला.

अंबानी यांच्याकडील सुरक्षा प्रमुखाने NIA ला जबाब दिला. २५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी आढळली. त्याचा जबाब आरोपपत्रात दाखल केला आहे. NIA ने ३ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.