गर्भवती महिलेनं घेतला एका पाठोपाठ एक १२ मित्रांचा जीव?; प्रियकरालाही संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:17 PM2023-04-28T18:17:24+5:302023-04-28T18:22:11+5:30

एका गर्भवती महिलेने एक एक करत तिच्या १२ मित्रांची विष प्यायला देत हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेने थायलँडमध्ये खळबळ माजली आहे. सध्या पोलिसांनी ३२ वर्षीय सारात रंगसिवुथापॉर्न या नावाच्या महिलेला अटक केली आहे.

आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासह एकूण १२ जणांना ठार केले आहे. सारात हिने साइनाइड विषाचा वापर करत हे हत्याकांड घडवले आहे. मृतांमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे वय ३३ ते ४४ वयोगटातील आहे. डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२३ या काळात महिलेने या हत्या केल्या. २५ एप्रिलला तिला अटक करण्यात आली.

१४ एप्रिलला सारात तिच्या प्रियकरासोबत रत्चबुरी प्रांतात गेली होती. त्याठिकाणी एका धार्मिक सोहळ्याला ते उपस्थित राहणार होते. मात्र सारातसोबत गेलेला तिचा बॉयफ्रेंड नदीकिनारी बेशुद्ध अवस्थेत आढळला. जेव्हा त्याला डॉक्टरांकडे नेले तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले.

या मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले तेव्हा त्याच्या शरीरात साइनाइड विष आढळले. परंतु हे साइनाइड कुठून आले? हा प्रश्न पोलिसांना पडला. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा एक एक धागेदोरे सापडले ते पाहून पोलीस हैराण झाले.

डिसेंबर २०२० पासून सारातच्या सर्व मित्रांची एका पाठोपाठ एक रहस्यमयपणे मृत्यू झाल्याचे पोलिसांसमोर आले. मग या सर्वांचा मृत्यू साइनाइडमुळे झाला? हे कळण्यासाठी पोस्टमोर्टमची गरज होती. तपासात या सर्व मृत्यूला सारात जबाबदार असल्याचं उघड झाले.

पोलिसांना सारातवर संशय आला. पोलिसांच्या मते, मृत्यूनंतर कुणाकडेही फोन, पैसा, बॅग आणि काहीच नव्हते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने या हत्या झाल्या असाव्या असं पोलिसांना वाटले. परंतु पैशासाठी सारात तिच्या मित्रांना का मारेल हा प्रश्नच होता.

बँकॉक पोलिसांना संशय होता पण विश्वास बसत नव्हता. सारात गर्भवती होती तिने सर्व आरोपांचे खंडन केले. तिच्या वकिलांनी या अवस्थेत सारातला त्रास देणे मानसिकदृष्ट्या योग्य नसल्याचे म्हटलं. तिच्या पोटात असलेल्या बाळाला नुकसान होऊ शकते असा दावा केला.

सिरियल किलिंगची ही घटना डिसेंबर २०२० पासून सुरू आहे. अद्याप पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत. मृतांमध्ये २ महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आरोपी महिलेने एका मित्राकडून ५ लाख ९७ हजार कर्ज घेतले होते असं समोर आले.

सारातने पैशासाठी तिच्या मित्रांची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. मृतांच्या घरातून ज्वेलरी आणि पैसेही गायब आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून मृतांच्या नातेवाईकांना तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून आरोपी महिला सारातला अटक केली आहे. तिची चौकशी केल्यानंतर या रहस्यमय मृत्यूंवरील खुलासा होऊ शकतो असं पोलिसांना वाटते.