मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:47 IST2025-10-28T12:41:01+5:302025-10-28T12:47:06+5:30

सध्या विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जात आहे.

भारतामध्ये आयटी, स्टार्टअप्स, रिअल इस्टेट आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होत आहे. अनेक कंपन्या खर्च कमी करण्यासाठी आणि एआय ऑटोमेशन लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत. तज्ज्ञांच्या मते, 2025 मध्ये तब्बल 50,000 टेक नोकऱ्यांना धोका निर्माण होणार आहे, तर 2023-24 मध्ये ही संख्या 25,000 होती.

टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि विप्रो यांसारख्या अग्रगण्य आयटी कंपन्यांनी आपल्या ऑपरेशनल आणि तांत्रिक प्रक्रियांमध्ये बदल करताना मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. टीसीएस एआय ऑटोमेशन लागू करत असल्याने सुमारे 20,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांनी स्किल्सच्या अभावामुळे, ग्राहकांच्या घटत्या मागण्या आणि कॉस्ट कटिंगच्या कारणाने मिळून 10,000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अशा परिस्थितीत कोणत्या क्षेत्रांमध्ये भविष्यात नोकरी सुरक्षित राहणार आहे? असा प्रश्न निर्माण होतोय.

1. वैद्यकीय आणि औषधनिर्माण क्षेत्र- अर्थव्यवस्थेत मंदी आली तरीही लोकांना वैद्यकीय सेवांची गरज कायम राहते. त्यामुळे डॉक्टर, नर्स, मेडिकल रिसर्चर, फार्मा सायंटिस्ट, लॅब टेक्निशियन आणि हेल्थ केअर असिस्टंट्स यांच्या नोकऱ्यांवर कोणताही धोका नाही. 2025 मध्ये वाढती लाइफ एक्स्पेक्टन्सी, हेल्थ इन्शुरन्सचे कव्हरेज आणि सरकारी आरोग्य योजना यांमुळे वैद्यकीय बाजारपेठ आणखी वाढणार आहे. कोविडनंतर या क्षेत्रात खासगी आणि सरकारी गुंतवणूक वाढत आहे.

2. शिक्षण आणि ऑनलाइन लर्निंग- आर्थिक बदलांनंतरही विद्यार्थी शिक्षण थांबवत नाहीत. त्यामुळे शिक्षक, शैक्षणिक प्रशासन, ई-लर्निंग कोर्स डेव्हलपर आणि एडटेक प्रोफेशनल्स यांची मागणी वाढली आहे. एआय-आधारित शिक्षण पद्धती आल्या असल्या तरी मानवी शिक्षकांची भूमिका अजूनही महत्वाची आहे. ऑनलाइन अपस्किलिंग आणि करिअर ग्रोथ कोर्सेसमुळे हा सेक्टर स्थिर राहिला आहे.

3. युटिलिटी सर्व्हिसेस- इलेक्ट्रिशियन, प्लंबर, HVAC तंत्रज्ञ यांसारख्या कामांमध्ये ऑटोमेशन शक्य नाही. लोकांना नेहमीच वीज, पाणी, दुरुस्ती, स्वच्छता आणि देखभाल सेवांची गरज असते. सरकार या सेवांना अत्यावश्यक मानते. त्यामुळे या क्षेत्रातील पॉवर स्टेशन इंजिनियर, सेफ्टी ऑफिसर, गॅस कंट्रोलर, वेस्ट वॉटर इंजिनियर आणि युटिलिटी मॅनेजर या नोकऱ्या सुरक्षित मानल्या जातात.

4. सरकारी सेवा आणि सार्वजनिक सुरक्षा- पोलीस, फायर फायटर, सुरक्षा रक्षक आणि सरकारी अधिकारी यांसारख्या नोकऱ्या छाटणीपासून सुरक्षित असतात. तसेच कायदेशीर सेवा आणि न्यायालयीन यंत्रणेमधील पदांवरही परिणाम होत नाही.

5. ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन- भारताच्या टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये ई-कॉमर्स बाजार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स रिटेल यांसारख्या कंपन्या लॉजिस्टिक्स नेटवर्क विस्तारत आहेत. त्यामुळे वेयरहाऊस मॅनेजर, ट्रक ड्रायव्हर, सप्लाय चेन सुपरवायझर अशा नोकऱ्यांची मागणी वाढली आहे. हा सेक्टर तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष ऑपरेशन्स यांना जोडतो.

6. एआय आणि डेटा प्रोफेशनल्स- काही आयटी नोकऱ्यांवर छाटणी होत असली तरी एआय इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट्स, मशीन लर्निंग एक्स्पर्ट्स, क्लाउड आर्किटेक्ट्स आणि फुल-स्टॅक डेव्हलपर्स यांची मागणी सतत वाढत आहे. कंपन्या ऑटोमेशनद्वारे खर्च कमी करत आहेत आणि त्याचबरोबर डेटा-आधारित निर्णयक्षमतेत गुंतवणूक वाढवत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नोकऱ्या दीर्घकाळ टिकतील.

7. सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट्स- कंपन्या क्लाउड स्टोरेज आणि ऑनलाइन सिस्टिमवर अवलंबून आहेत. त्यामुळे डेटा चोरीचा धोका वाढला आहे. सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट्स, नेटवर्क डिफेन्स इंजिनियर्स आणि इन्फोसेक स्पेशालिस्ट्स यांची मागणी बँका, ई-कॉमर्स आणि सरकारी क्षेत्रात मोठी आहे.

8. रिन्यूएबल एनर्जी- भारताने 2030 पर्यंत 500 गीगावॅट रिन्यूएबल एनर्जी निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे सोलर इंजिनियर, सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट, ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर एक्स्पर्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजर या क्षेत्रांमध्ये संधी वाढत आहेत. क्लायमेट चेंज आणि ग्रीन टेक्नॉलॉजीवरील गुंतवणुकीमुळे हे क्षेत्र भविष्यातील सर्वाधिक स्थिर रोजगार देणारे ठरू शकते.