तुम्हाला प्रमोशन कशामुळे मिळत नाही, माहितेय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:34 IST2025-08-25T15:25:12+5:302025-08-25T15:34:39+5:30
तुम्ही ऑफिसात जीव ओतून काम करता. जागेवरून तास-तास उठतसुद्धा नाही. सदा तुमचं डोकं फायलींत किंवा प्रेझेंटेंशनमध्ये घुसलेलं असतं पण तरीदेखील तुम्हाला प्रमोशन मिळत नाही. जे काहीच करत नाही, असं तुम्हाला वाटतं, त्यांना वेळच्या वेळी प्रमोट केलं जातं. असं का होत असेल?

तुमचे काम दिसत नाही का? तुम्ही उत्तम काम करता, पण ते मॅनेजरच्या नजरेत येत नाही. तुम्ही पडद्यामागे राहून योगदान देता. कामच बोलते, असे तुम्हाला वाटते. हे करा : असे काही करा की, काम लोकांना दिसेल. सांगा की मी हे केलेय. असे प्रोजेक्ट निवडा, ज्यात इतर टीमचे लोकही असतील.
अडचणी सोडवता, पण त्या रोखता का? तुम्ही अडचणी सोडवण्यात तरबेज आहात, पण कंपनीला संकटे रोखणारी माणसे हवी असतात. फक्त समस्या सोडवणे पुरेसे नाही. हे करा : समस्या सोडवली पण ती पुन्हा उद्भवू नये म्हणून जे केले, ते मॅनेजरला दाखवा. अशा बाबींच्या नोंदी वेळच्यावेळी ठेवा.
मला हे हवंय, हे स्पष्ट बोललात का? माझं काम ओळखून मला प्रमोशन मिळावं, असं तुम्हाला वाटतं. तुम्ही आहात तेथेच समाधानी आहात, असं मॅनेजरला वाटतं. कारण तुम्ही कधी काही बोललाच नाहीत. हे करा : ‘बाळ रडल्याशिवाय आईही दूध पाजत नाही’ हे तुम्ही ऐकलंच असेल. त्यामुळे मॅनेजरला स्पष्टपणे बोला.
कंपनीला काय हवं हे तुम्हाला समजलंय का? तुमच्याकडे लेखी पात्रता सगळ्या आहेत. पण त्याशिवाय कंपनीला काय हवं, हे तुम्हाला माहीत नाही. कागदांवरील निकष आणि मॅनेजरच्या अपेक्षा वेगळ्या असतात. हे करा : प्रमोशन मिळालेल्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंकून त्यांना विचारा की त्यांच्या यशाचं गमक काय आहे.
तुमचा कोणीच ‘गॉडफादर’ नाही का? प्रमोशनच्या वेळी मॅनेजर तुमची बाजू ठामपणे मांडत नाही. इतरांचे पाठीराखे मॅनेजर त्यांच्यासाठी लढतात. ज्यांना तुमचे कामच माहीत नाही, असे प्रमुख लोक तुमच्या प्रमोशनची चर्चा करतात. हे करा : एकापेक्षा अधिक मॅनेजर्सशी सलोख्याचे संबंध ठेवा.
तुम्हीच स्वत:ला अडकवलंय का? कंपनीला तुम्ही सध्याच्या भूमिकेतच हवे आहात कारण तुमचे काम दुसरा कुणी करू शकत नाही. प्रमोशनच्या वेळी ‘आम्हाला तुमची या भूमिकेत गरज आहे’ असे सांगितले जाते. हे करा : पुढे जायचे तर इतर सहकाऱ्यांना तुमचे काम शिकवा.