तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
By जयदीप दाभोळकर | Updated: July 18, 2025 09:29 IST2025-07-18T09:19:19+5:302025-07-18T09:29:37+5:30
Sukanya Samriddhi Yojana: जर तुम्हाला नुकतंच कन्यारत्न झालं असेल किंवा तुम्हाला आधीच मुलगी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. सरकारकडे एक उत्तम योजना आहे ज्यामध्ये दरमहा थोडी बचत करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.

Sukanya Samriddhi Yojana: जर तुम्हाला नुकतंच कन्यारत्न झालं असेल किंवा तुम्हाला मुलगी असेल तर तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे. सरकारकडे एक उत्तम योजना आहे ज्यामध्ये तुम्ही थोडे पैसे वाचवून तुमच्या मुलीसाठी लाखोंचा निधी तयार करू शकता. या योजनेचं नाव सुकन्या समृद्धी योजना आहे.
यामध्ये सरकार ८.२% चं भरघोस व्याज देते आणि कर सवलत देखील मिळते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला दरमहा थोडीशी रक्कम जमा करावी लागेल आणि जेव्हा तुमची मुलगी २१ वर्षांची होईल तेव्हा तुमच्याकडे मोठी रक्कम तयार असेल. तुमच्या मुलीचे शिक्षण आणि लग्न यासारख्या मोठ्या खर्चात ही योजना उपयुक्त ठरू शकते.
ही योजना अजूनही ८.२% वार्षिक व्याज देते आणि यातील रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि दरमहा एक निश्चित रक्कम जमा केली, तर ती २१ वर्षांची होईपर्यंत तुम्हाला सुमारे ५ लाख रुपये मिळू शकतात. म्हणूनच ही योजना विशेषतः मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक उत्कृष्ट गुंतवणूक संधी मानली जाते.
तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत फक्त २५० रुपयांमध्ये खातं उघडू शकता. तुम्ही हे खाते जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत सहजपणे उघडू शकता. या योजनेत, तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि मुलगी २१ वर्षांची झाल्यावर संपूर्ण रक्कम मिळेल.
प्रत्येक वर्गातील पालक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. मग त्यांचं उत्पन्न कमी असो वा जास्त. हे खातं फक्त मुलीच्या नावानं उघडता येतं. कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावानं खातं उघडता येऊ शकतं.
जर तुम्ही दरमहा ₹१००० म्हणजेच दरवर्षी ₹१२,००० जमा केले तर १५ वर्षांत एकूण ₹१,८०,००० जमा होतील. यावर तुम्हाला सुमारे ₹३,७४,६१२ व्याज मिळेल. अशा परिस्थितीत, जेव्हा तुमची मुलगी २१ वर्षांची होईल, तेव्हा तुम्हाला एकूण ₹५,५४,६१२ मिळू शकतात आणि तुम्ही दरमहा फक्त १००० रुपये गुंतवाल.
जर मुलगी १८ वर्षांची झाली आणि तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैशांची आवश्यकता असेल, तर तुम्ही एकूण जमा रकमेच्या ५०% पर्यंत रक्कम काढू शकता. यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. मुलीच्या भविष्यासाठी ही योजना एकदम उत्तम ठरू शकते.